नवरात्रोत्सवादरम्यान ‘जनहित मंच’चा उपक्रम : ‘रोटी, कपडा आणि मकान’चा संघर्ष कायमच वर्धा: स्पर्धेच्या युगात समाजातील प्रत्येक व्यक्ती यशाकरिता धडपडत असतो. काहीजण यशाची शिखरेही गाठत असले तरी समाजातील एका घटकाचा अजूनही ‘रोटी, कपडा आणि मकान’ चा संघर्ष संपलेला नाही. निम्न मध्यमवर्गीय आणि त्याहून खालच्या वर्गाचा म्हणजे कष्टकरी व गरीब यांचे महागाईच्या चटक्याने हाल सुरू आहेत. या उपेक्षित वर्गाला दिलासा देण्याच्या दृष्टीने ‘जनहित मंच’ वर्धाने नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून वकारे बिल्डींग, पाषाण चौक, मालगुजारीपूरा, येथे ‘जनहित कपडा बँक’ सुरू केली आहे.सध्या लोकांचे राहणीमान उंचावले आहे. महागडे कपडे खरेदी करून काही महिने वापरल्यानंतर सहजपणे टाकणारे अनेक नागरिक आहेत. तर दुसरीकडे एकच कपडा वर्षभर वापरून गरीबीचे चटके सोसत आहेत. अशी गरीबांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहेत. ही वाढती दरी ‘जनहित मंच’ च्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत होती. गरीबांना, कष्टकरी, वंचित व उपेक्षित वर्गाला मदतीचा हात द्यावयाचा या उदात्त हेतूने प्रेरित होवून ‘जनहित कपडा बँक’ ही संकल्पना पुढे आणली. गत वर्षी याच उद्देशाने जनहित मंच, वर्धा ने मेळघाट येथे जावून तेथील आदिवासी, गरीब लोकांना कपड्याचे वितरण केले होते. याच अवस्थेतून वर्धा शहरातील गरीब, गरजू, उपेक्षीतांसाठी वर्ध्यात ‘जनहित कपडा बँक’ सुरू करण्याचे ठरविले.जनहित मंच ने संकल्प केलेल्या या योजनेला प्रथमत: कार्यकर्त्यांनी व संबंधित दात्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आपल्याकडे असलेले कपडे जमा केले. त्यातून या कपडा बँकेची निर्मिती केली. शहरातील अनेक लोकांकडे कपड्यांचे अनेक जोड असतील त्यातील काही जोड जुने झाल्यामुळे कपाटात पडून असतील. हे न वापरणारे व कपाटात पडून असलेले कपडे आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही हे गरजूंना वितरीत करू, असे आवाहन जनहित कपडा बँकचे प्रकल्प प्रमुख डॉ. जयंत मकरंदे यांनी केले.शर्टस, टी शर्टस, पँट, साडी, पंजाबी ड्रेस, जॅकेट, शॉल, चादर, उशीच्या खोळी, बेडसीटस, टॉवेल्स असे सर्व प्रकारचे कपडे जनहित कपडा बँकेच्या कलेक्शन सेंटरला जमा करता येईल. वाढत्या महागाईत गरीब लोक कपडे खरेदी करू शकत नाही. निम्न मध्यमवर्गीय, गरीब व कष्टकरी वर्ग ऐपत नसल्यामुळे कपडे खरेदी पासून वंचित राहतात हे वास्तव आहे. या वंचितांसाठी जनहित कपडा बँक वरदान ठरणारी आहे. या अभिनव योजनेला व गरीब कष्टीकरी वंचित व उपेक्षितांना मदतीचा हात म्हणून शहरातील नागरिकांनी स्वत:हून पुढे येवून सहकार्य करावे, असे आवाहन जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, सचिव डॉ. राजेश आसमवार, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर, भास्कर पारखी, सहसचिव प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे, कोषाध्यक्ष अनुपकुमार भुतडा, पदम ठाकरे, अनिल नरेडी, प्रा. दिनेश चन्नावार, पवन बोधनकर, दिनेश रूद्रकार आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
वर्ध्यात प्रथमच गरीब व वंचितांसाठी ‘जनहित कपडा बँक’
By admin | Updated: September 30, 2016 02:25 IST