गावकऱ्यांशी चर्चा : अहवाल तयार करणारकारंजा (घाडगे) : तालुक्यातील वाघोडा गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर आमचे गाव विकत घ्या, अशी भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेची दखल घेत तहसीलदार जी. बालपांडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी महंत व त्यांचे सहकारी रविवारी गावाला दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या भागातील जमिनी हलक्या प्रतिच्या आहेत. अशात पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती ढासळली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे, असा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. त्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे बालपांडे यांनी गावकऱ्यांना सांगितले. मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पाऊस पडला. यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकाची उगवण न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर २८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता पाऊस न आल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढणार. यामुळे जगणे कठीण होण्याची वेळ आली आहे. अशात शासनही पाठीशी नाही, असे म्हणत गावकऱ्यांनी आंदोलन पुकारले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज अधिकारी गावात आले. मात्र विभागाच्या लोकप्रतिनिधींनी अद्यापही गावाला भेट दिली नसल्याने रोष व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
वाघोडा गावात तहसीलदार दाखल
By admin | Updated: July 20, 2015 02:05 IST