लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी) : अलीकडच्या काळात शेतीचा व्यवसाय सतत तोट्यात येत असताना पोटाला पिळ देऊन आर्थिक झळ सोसत शेतकरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडत आहे. देवळी तालुक्यातील आहे. सोनेगाव (आबाजी) येथील शेतकरी सतीश दाणी यांनीही आपल्या मुलासाठी कष्ट उपसले आणि मुलानेही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत अभ्यासातील सातत्यातून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आयकर विभागातील कर सहायक या पदाला गवसणी घातली आहे.
ऋषिकेश सतीश दानी रा. सोनेगाव (आबाजी) याने पहिलीचे शिक्षण गावातील शाळेतच घेतले. त्यानंतर पाचवी पर्यंत त्याने वर्ध्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. सहावी ते दहावीचे शिक्षण त्याने सावंगी येथील स्कूल ऑफ स्कॉलर मधून पूर्ण केले. सावंगी मध्ये शिक्षण घेत असताना त्याला दररोज सकाळी ६ वाजता सोनेगावरून देवळीला सोडून द्यावे लागत होते, आणि दुपारी ४ वाजता घ्यायला यावे लागत होते. हा दिनक्रम सलग पाच वर्षापर्यंत सुरू होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विजयवाडा येथून अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले, त्यानंतर नागपुरातील एनआयटी कॉलेजमधून त्याने इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकॉमिनिकेशन मध्ये बीटेकची पदवी प्राप्त केली. पण कोरोना काळामध्ये शेवटचे वर्ष घरूनच करावं लागलं. परीक्षाही घरूनच द्यावी लागली, आणि त्यात यशही मिळाले.
अपयशानंतरही सातत्य कायमपदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. दोन वर्षे तयारी केल्यानंतर दुसन्या वर्षी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाला, व नंतर मुख्य परीक्षेत अपयश आले. तरीही हार न मानता जिद्दीने अभ्यास करून परीक्षा देणे सुरूच ठेवले. अखेर त्याला या परीक्षेमध्ये यश आले. यावर्षी सीजीएल एसएससी ही परीक्षा दिल्यावर त्याची आयकर विभागामध्ये कर सहायक म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या या यशामुळे गावाचेही नावलौकिक झाले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
"मी आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही मिळवलं आहे, ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आई-वडील आणि परिवारातील सदस्यांमुळेच. यामध्ये गुरुजण आणि सर्व मित्रमंडळींचाही सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या मदतीमुळेच मला शिक्षण पूर्ण करता आले आणि आता हे यशही साध्य करता आले. त्यामुळे मी या सर्वांचा सदैवच शतशः ऋणी आहे."- ऋषिकेश सतीश दाणी, कर सहायक