लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती देत असून जून महिन्यातच पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरणीच्या कामाला गती देणार आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. या बियाण्यांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्याला ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची गरज पडणार आहे. शेतकरी सध्या शेतात शेणखत टाकणे, शेतजमिनीची नांगरणी करणे, उन्हाळवाही करणे आदी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्धखरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण १ लाख १३ हजार १३० मेट्रिक टन युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एकत्रित खताची गरज पडणार असून तशी मागणी कृषी विभागाने केली आहे. जिल्ह्यात ४८ हजार ८५२ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खरिपात खत कोंडी होणार नाही या हेतूने वेळीच खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे.