वर्धा : पेरण्या आटोपल्या असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे किमान मशागतींच्या कामासाठी कर्ज मिळावे म्हणून शेतकरी धडपड करीत आहे. याचा फायदा घेत दलाल शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसतात. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकऱ्याची अशीच दोन लाखांनी फसवणूक झाली. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकरी विठ्ठल मोतीराम भोयर यांची सर्व्हे क्र. ४५७ व ५१७ येथे आराजी अनुक्रमे ४.३० हे.आर. व २.६० हे.आर. शेती आहे. गतवर्षी ते पीक कर्जासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे गेले. तेथे मुकेश रोडे, रा. दोंदुडा याने त्यांना तुम्ही आयआयसीआय बँकेतून कर्ज घ्या. तेथील बँक मॅनेजर व कर्मचारी ओळखीचे आहे. तुम्हाला त्रास न होता कर्ज काढून देऊ, असे सांगितले. यावर भोयर यांनी बँकेत चलण्यास सांगितले असता तुमच्या घरी बँकेचे अधिकारी घेऊन येतो, असे सांगितले. यानंतर लगेच दोन दिवसांनी रोडे व बँकेचा पंकज नामक कर्मचारी भोयर यांच्या घरी सावली (वाघ) येथे पोहोचले. त्यांनीच सातबारा, आठ-अ आदी कागदपत्रे काढून आणली. सोबतच आयसीआयसीआय बँकेचा नवीन खाते उघडण्याचा अर्जही आणला. बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितल्याने भोयर यांनी विश्वासाने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या. शेतकरी भोयर यांचे पासपोर्ट फोटो, मुलगा बापुराव व सुनेच्या सह्या व फोटोही घेतले.यानंतर पुन्हा शेतकऱ्याच्या घरी दलाल व कर्मचाऱ्याने पीककर्जाच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. यानंतर परस्पर साडे तीन लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. बँकेचे चेकबुकही शेतकऱ्याला घरीच आणून दिले. यातील काही कोऱ्या धनादेशावर भोयर यांच्या सह्या घेतल्या. लगेच साडे तीन लाख रुपये भोयर यांच्या बँक खात्यात जमा झाले. काही दिवसांनी त्यांना बँकेचे एटीएम कार्ड मिळाले. यानंतर बँकेत जाऊन शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाची भेट घेतली असता मुकेश रोडे व पंकज नामक तेथेच बसलेला कर्मचारी बँकेचाच आहे, असे सांगितले. मंजूर कर्ज तुमच्या खात्यात जमा झाले. कर्जाच्या मोबदल्यात ६.६९ लाखांचा बोजा सातबारावर चढविल्याचेही सांगितले. भोयर यांनी काही रक्कम काढली; पण कर्मचारी व दलालाने कोऱ्या धनादेशाद्वारे दोन वेळा एक-एक लाख रुपये काढले. शेतकरी बँकेत गेला असता खात्यातून दोन लाख रुपये काढले व फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून किसान सभेमार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार केली असून कारवाईची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:22 IST