वर्धा : स्त्रियांची आक्रमक प्रतिमा निर्माण करणे, हा स्त्रीवादी विचारांचा उद्देश नसून स्त्री-पुरूषांची निकोप मैत्री समानतेच्या आधारावर उभी राहावी, ही अपेक्षा आहे. स्त्रीवादाला अनुल्लेखाने मारण्याऐवजी सर्वांगिण स्तरावर समजून घेतले पाहिजे. स्त्रीवादाची मांडणी मैत्री, करुणा, मुदिता आणि अपेक्षा या मुल्याधारे झाली तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक वंदना भागवत यांनी केले़ स्थानिक शिववैभव सभागृहात यशवंत दाते स्मृती संस्थेचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला़ यावेळी त्या बोलत होत्या़ समारोहात साहित्य आणि सामाजिक ऋण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.पुरस्कार वितरण लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, पुरस्कार समिती संयोजक प्रा. राजेंद्र मुढे, डॉ. स्मीता वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना डॉ. गोगुलवार म्हणाले, नागरी समाज अजूनही दुर्गम भागातील आदिवासींकडे अज्ञानी म्हणूनच बघतो. वस्तूत: आदिवासींनी निसर्ग, औषधीविषयक जपलेले पारंपरिक ज्ञान आणि जगण्याचे शहाणपण आमच्याकडे नाही. आदिवासी परावलंबी नाहीत. ती त्यांच्या जगण्याची साधने स्वत:च शोधतात. त्यांचे परंपरागत शहाणपण आमच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडले तर मानवी जीवन सुकर होईल. प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. संचालन डॉ. स्मीता वानखेडे यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
स्त्री-पुरूषांची निकोप मैत्री स्त्रीवादाला अपेक्षित
By admin | Updated: February 4, 2015 23:21 IST