बहारची नोंद : पक्षिमित्रांसाठी पर्वणीवर्धा : बर्डलाईफ इंटरनॅशनल या जागतिक शिखर संस्थेने संकटसमीप प्रजातीत समाविष्ट केलेल्या युरेशियन कोरल पुलगाव येथील पाणवठ्यावर आढळला. त्याच पाणवठ्यावर ‘तेम्मिंकचा टिलवा’ची नोंद बहारच्या पक्षी अभ्यासकांनी केली.युरेशियन कोरल या पक्षाला इंग्रजीत ‘युरेशियन कर्ल्यु’ असे म्हणतात. हा एक मोठ्या आकाराचा फिक्कट मातकट रंगाचा मोठा बाकदार चोच असलेला जलचर पक्षी आहे. त्याचा पिसारा ठिपके असलेला आणि चट्टेरी तपकीरी असतो. उडताना टोकदार व पांढुरके डाग दिसतात. नरमादी दिसायला सारखेच दिसतात. मुख्यत: भारतीय किनारपट्टीवरचा हा हिवाळी पाहुणा आहे. पण तो मोठ्या तलावांवर आणि नद्यांवर देखील दिसतो. एक एकटा किंवा छोट्या छोट्या विखुरलेल्या थव्यांमध्ये इतर चिखलपायऱ्या पक्षांबरोबर आढळतात. युरोपमधून दक्षिण आशियाकडे ते स्थलांतर करतात. याच पाणस्थळावर आणखी एक हिवाळी पाहुणा आढळलेला असून तो तेम्मिंकचा टिलवा या नावाने ओळखला जातो. या पक्षाला इंग्रजीत तेम्मिंक स्टिन्ट असे म्हणतात. लहान आकाराचा व वरील भागाचा गडद रंग असलेला हा पक्षी याचा वावर हिवाळ्यात भारतभर असतो. समशिमोष्ठा प्रदेशात त्यांची वीण होते. जिल्ह्यातील हिवाळी पक्ष्यांच्या अध्ययनादरम्यान या दोन पाहुण्या पक्षांची नोंद झाली. त्यांना पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे व वन्यजीव छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांनी कॅमेराबद्ध केले आहे. बहार नेचर फाऊंडेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा पक्षीसूचित या दोन पक्ष्यांची भर पडली आहे.(प्रतिनिधी)
पुलगावात आढळला ‘युरेशियन कोरल’
By admin | Updated: January 15, 2016 02:55 IST