अनेकांचे आरोप : सिंदी लाईनमध्ये चालला जेसीबी वर्धा: वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण काढत पालिकेच्यावतीने मंगळवारी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. सिंदी लाईन परिसरात राबविलेल्या या मोहिमेत रस्त्याच्या कडेला बसून काम करीत पोट भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे पालिकेच्यावतीने छोट्यांवरच बडगा उगारण्यात येतो, तर मोठ्यांना मात्र अभय देण्यात येत असल्याची ओरड होत असल्याचे दिसून आले. येथील नगर पालिकेच्यावतीने सकाळपासूनच अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरुवात झाली. प्रारंभी बस स्थानकासमोरील रस्त्यावर असलेले लहान दुकाने हटविण्यात आली. रस्त्याच्या कडेला अतिक्रमणात असलेली अल्पोहाराची टपरी सदर कारवाई दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा ताफा सिंदी लाईन मध्ये शिरला. सिंदी लाईन येथील दुकानावरील असलेले अतिक्रमण काढण्यात आले. कर्मचाऱ्यांचा ताफा पाहुण परिसरातील दुकानदारांनी रस्त्यावरील साहित्य दुकानाच्या आत नेला. येथील ठेले, हातगाड्या आणि रस्त्यावरील दुकाने तसेच दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ही लावण्यात आला होता. कारवाईच्या वेळी नगर पालिकेचे अभियंता सुधीर फरसोले, अशोक ठाकूर, निखील लोहवे, लिलाधर निखाडे, शिवाजी थोरात, तुषार गोळघाटे, प्रमोद तामगाडगे, दिलीप तराळे तर पोलीस कर्मचारी भगवान बावणे, दिलीप राठोड, राजेंद्र ठाकरे, अलका टिपले यांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
छोट्यांवरच अतिक्रमणाचा बडगा
By admin | Updated: December 9, 2015 02:26 IST