वाहतुकीचा बोजवारा : वाहन चालकांना मनस्तापआर्वी : शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते सध्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.आर्वी शहराच्या मुख्य व रहदारीच्या मार्गावरून जड वाहनांचा राज्यमार्ग जात असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा तोकडी पडत आहे. द्रुगवाडा-पुलगाव-आर्वी-हैदराबाद हा राज्यमार्ग आर्वीतून जातो. यात आर्वी मार्गे पुलगाव हैदराबादला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रस्ते गर्दीने गजबजत असल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळते. याच मार्गावर सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील व न. प. कार्यालयासमोर सध्या फेरीवाले आणि हातगाडी दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. शिवाजी चौक हा शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पोलीस विभागाच्यावतीने या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व जड वाहनांना शहरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी वाहतूक कर्मचारी असणे गरजेचे आहे. यात रहदारीच्या मुख्य मार्गावरून भरधाव जड वाहने देऊरवाडा मार्गे धावतात. यात शिवाजी चौकासमोरील शासकीय कार्यालयासमोर रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यात बरेचदा किरकोळ अपघातही होतात. तसेच यामुळे शहरातील मुख्य रस्त्याला बकाल स्वरूप आले आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गावरही फेरीवाले व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यात सुनील कटियारी, रामनाथ गुरूनाथसिंगाणी, सुनील वधवा, किसन कोडवानी, महेश करतारी, सोनू मोटवानी, आदी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागणी केली आहे. यात पालिका प्रशासन व पोलीस विभाग याची संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
आर्वीच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By admin | Updated: April 24, 2016 02:20 IST