सहा भूखंड शिल्लक : उलाढाल पाच हजार ४८० कोटींची देवळी : जिल्ह्यात एमआयडीसी व बाहेर १९ मध्यम आणि मोठे उद्योग आहे. यात ५ हजार ४८० कोटी रुपयांची उलाढाल होत असली तरी केवळ ९ हजार ८९४ बेरोजगारांनाच रोजगार उपलब्ध झाला आहे. एमआयडीसीमध्ये महालक्ष्मी टीएमटी तर वर्धेत औद्योगिक क्षेत्राबाहेर असलेल्या लॉयड्स स्टील आणि उत्तम व्हॅल्यू या उद्योगांना कोळशाची गरज भासते. हे तीनही उद्योग सुरळीत सुरू आहेत. कोळसा पुरवठा करण्याची गरज पडणारे बंद झालेले उद्योग जिल्ह्यातील एमआयडीसींमध्ये नसल्याची माहिती आहे. यात प्रामुख्याने स्टील उत्पादन, सुतगिरणी, कापड तयार करणे आदी घटकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सात मोठे प्रकल्प असून २८०५.९३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच ४ हजार ९७४ लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात ३ हजार २६३ सुक्ष्म व लघु उद्योग आहे. यात ४२५.०२ कोटी रुपयांची गुंतणवूक आहे. यात १७ हजार ६६७ लोकांना रोजगार मिळाला आहे. यात जिनिंग, प्रेसिंग, दालमिल, आॅईल मिल, फेब्रिकेशन, शेतकी अवजारे, डेअरी आदींचा समावेश करण्यात आला आहे. यातून रोजगार मिळाला असला तरी स्थानिक बेरोजगारांची समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे याविषयी अनेकदा आंदोलन करण्यात येतात. तसेच कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसते.(प्रतिनिधी)
९ हजार जणांनाच रोजगार
By admin | Updated: August 13, 2016 00:52 IST