कृषी पंप : शेतकर्याला पुन्हा डिमांड भरण्याची नोटीस वायगाव (निपाणी) : येथील एका शेतकर्याच्या शेतात कृषी पंपाकरिता वीज जोडणी असताना कंपनीच्यावतीने त्या शेतकर्याला जोडणीकरिता पुन्हा डिमांड भरण्याचे फर्मान काढले आहे. हे फर्मान पाहून शेतकरी चांगलाच अवाक् झाला आहे. नजीकच्या भिवापूर येथील शेतकरी नाना वामनराव वाणी यांनी त्यांच्या शेतात विद्युत वितरण कंपनीकडे विद्युत मिटरची मागणी केली. या मागणीनुसार सन २0११-१२ मध्ये शेतात विद्युत जोडणी सुद्धा करण्यात आली. त्यात नियमाप्रमाणे ४ हजार ४६0 रुपयांचा भरणा केला. विद्युत वितरण कंपनीच्या वायगाव (नि.) येथील अभियंत्यांनी टेस्ट रिपोर्ड सुद्धा दिला. शेतात खांब टाकून विद्युत सुरू करण्यासाठी लाईनमन दुबे यांनी मिटर सुद्धा बसून दिले; मात्र २0११-१२ पासून विद्युत बिल देण्यात आले नाही. अशात कंपनीने जर एकाच वेळी मोठय़ा रकमेचे देयक दिले तर ते भरणे कठीण जाईल असे म्हणत वाणी यांनी कनिष्ठ अभियंता विनोद मसकरे यांच्याशी संपर्क साधत देयक का आले नाही या बाबत विचारणा केली. मात्र या शेतकर्यांच्या विद्युत पुरवठय़ा बाबत कोणतेही रेकॉर्ड विद्युत वितरण कंपनीकडे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तुम्ही पुन्हा नवीन डिमांड भरा नवीन विद्युत जोडणी करा असा सल्ला त्यांना देण्यात आला. यात कंपनीत कुठलीही नोंद नसताना या शेतकर्याला वीज पुरवठा कसा झाला, याची कंपनीच्या कार्यात कुठलीही नोंद नाही, यामुळे कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. याकडे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी होत आहे. याकडे जिल्ह्याच्या अधिकार्यांनी लक्ष देत शेतकर्याची समस्या मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
विद्युत कंपनीकडे जोडणीचा रेकॉर्ड नाही
By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST