पालिकेकडून मोहीम गरजेची : अनेक दुर्गा मंडळाच्या परिसरातच कचऱ्याचे ढिगारे वर्धा : शहरातील नवरात्रोत्सव नावलैकीक प्राप्त होवून आहे. या काळात शहराला जत्रेचे स्वरूप येते. याच कारणाने शहरातील रस्ते स्वच्छ असणे अपेक्षित आहे; मात्र वर्धेत नवरात्रोत्सव एका दिवसावर असताना शहरातील अनेक रस्त्यात कचऱ्याचे ढिग कायम असल्याचे दिसून येत अहे. त्याची दुर्गंधी पसरत असून नागरिकांना या काळात त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. या कारणाने पालिकेने हा कचरा उचलण्याची गरज आहे. शहरातील मुख्य मार्ग असो वा उपमार्ग, प्रत्येक मार्गावर दूर्गा मंडळाच्यावतीने देवीची स्थापना करण्यात येते. येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकरिता विविध प्रकारची रोषणाई करण्यात येते. या नऊ दिवसात विविध धार्मीक कार्यक्रम असतात. याची वर्धा पालिकेला कल्पना असताना त्यांच्याकडून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील मुख्यमार्गासह अंतर्गत मार्गावर कचऱ्याचे ढिगारे पडून असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पालिकेच्यावतीने कचरा उचलणे सुरू केल्या दिसून आले. मात्र मुख्यमार्गावर ज्या ठिकाणी मंडळाच्यावतीने देवीची स्थापना होते त्याचठिकाणी कचरा साचून असल्याचे दिसून आले आहे. याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)बाजार समितीच्या भाजी बाजारातही तीच अवस्था कृषी उत्पन्न बाजार सिमतीत भाजी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून देवीची स्थापना करण्यात येते. या भागात पडलेले खड्डे बुजविण्याकरिता मध्यंतरी मुरूम व चूरी टाकण्यात आली होती. आता पुन्हा तशीच अवस्था निर्माण झाली आहे. या खड्ड्यांसह भाजी बाजारात कचऱ्याची स्थिती कायम आहे. येथे भाजीचा व्यवसाय होत असल्याने येथे कचरा होणे नित्याचेच आहे. असे असले तरी बाजार समितीच्यावतीने त्याची उचल करणे गरजेचे आहे. या बाजारात देवीची स्थापना करण्यात येत असल्याने येथे स्वच्छतेच्या मागणीकरिता दूर्गा मंडळाच्या सदस्यांनी अडते मापारी गटाचे सभासद विजय बंडेवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बाजार समितीत होत असलेल्या कचऱ्याची उचल करून स्वच्छता राखण्याचा कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आल्याचे या सदस्यांना सांगितले. या बाबत त्याला सूचना करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी या मंडळाच्या सदस्यांना दिले आहे. याकडे जर तो कंत्राटदार दुर्लक्ष करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे बंडेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या काळातही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
By admin | Updated: September 30, 2016 02:29 IST