दोन घटनेत दोघांचा मृत्यू : हिंगणघाटच्या घटनेत दोन दिवसांनी आढळला मृतदेह सेलू : तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) येथील धामनदी पात्रावर दूर्गा देवीच्या विसर्जनाकरिता गेलेल्या वडिलाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांना मुलाला वाचविण्यात यश आले. विनोद फुलचंद तुमडाम (४०) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, विनोद हा त्याचा नऊ वर्षांचा मुलगा गौरव याला घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. विनोद हा पट्टीचा पोहणारा अशी त्याची ख्याती होती. त्याच्या मुलाला खांद्यावर बसून तो खोल पाण्यात उतरला काही वेळाने मुलगा गंटागळ्या खात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. काहींनी मुलाला बाहेर काढले; मात्र विनोद तिथे आढळला नाही. अर्धा तासाने विनोदला पाण्याबाहेर काढून सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने गावात शोककळा पसरली असून एकाही घरी दसरा साजरा केला नाही.(तालुका प्रतिनिधी)हिंगणघाट येथे युवकाचा मृत्यू हिंगणघाट-दुर्गा देवीच्या घट विसर्जनासाठी वणा नदीच्या धोबी घाटाजवळ मित्रांसह गेलेल्या २३ वर्षीय युवकाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. अमोल शंकरराव राडे (२३) रा. हनुमान वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, हनुमान वॉर्डातील देवी मंदिरातील घटाच्या विसर्जनासाठी अमोल राडे हा वणा नदीच्या पात्रात मित्रासह गेला होता. तो नदीच्या धोबी घाटाजवळच्या विठ्ठलाच्या मूर्ती परिरातील खोल पाण्यात बुडत असताना दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्या ठिकाणी बुधवारी दिवसभर मासेमाऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी शोध मोहीम राबविली. परंतु त्याचा शोध लागला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी ६ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पोलीस कर्मचारी अण्णा दुर्गे तपास करीत आहे. सदर युवक पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच हनुमान वॉर्ड व परिसरात शोककळा पसरली त्यामुळे दसऱ्याचा सण अनेकांनी साजरा केला नाही.(तालुका प्रतिनिधी)कालव्यात तरुणाची आत्महत्यापुलगाव - नजीकच्या विरूळ (आकाजी) येथील अमोल माणिक शेंडे (३२) याने गुरुवारी सायंकाळी ६ वाजता गुंजखेडा येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. रात्रभर शोध घेतला असता शुक्रवारी सकाळी ९ वाजता कालव्यामध्ये मृतदेह तरंगताना आढळला. अमोल विरूळ येथील शिवसेना कार्यकर्ता असून तंटामुक्त समिती अध्यक्ष होते. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी व दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.(शहर प्रतिनिधी)
दुर्गा विसर्जनात पित्याचा मृत्यू, मुलगा बचावला
By admin | Updated: October 24, 2015 02:04 IST