झाडे वाळण्याचा धोका : आवश्यक त्या उपायोजना करण्याची गरजवर्धा : यवतमाळ - वर्धा - नागपूर महामार्ग हा हिरवळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर विपूल प्रमाणात असलेली कडुलिंबाची झाडे आरोग्यवर्धक हवा आणि सावली प्रवाश्यांना देतात. पण अनेक झाडांना उधळीने पोखरणे सुरू केल्याने अनेक झाडे मृतप्राय: होण्याच्या मार्गावर आहे. याचा थेट विपरित परिणाम वातावरणात होणार आहे. असे असतानाही रस्ते विकास महामंडळ मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाहतुकीच्या सोयीसाठी यवतमाळ- वर्धा - नागपूर असा महामार्ग तयार करण्यात आला. हा मार्ग निर्माणाधीन होत असताना रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली. यात वर्धा - पवनार या दरम्यान बहुतांशी कडुलिंबाची झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे, शिरस, करंजी आदी झाडांचाही यात समावेश आहे. यामध्ये कडुलिंबाची झाडे ही सर्वांसाठीच उपयुक्त असून त्याची बहुलता आरोग्यासाठी फायद्याची आहे. तसेच या झाडांची पूर्णपणे वाढ झाल्याने संपूर्ण मार्गावर या झाडांचे सावलीसारखे आच्छादन तयार झाले आहे. ही झाडे वर्षानुवर्षे जगावी, त्यावर कुठलाही रोग वा कीड येऊ नये यासाठी झाडांच्या बुंध्यापासून तीन ते चार फूट उंचापर्यंत मोरचूद आणि चुना याचे मिश्रण मारणे गरजेचे असते. तसेच दर काही वर्षात ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. परंतु ही प्रक्रिया या काही वर्षात करण्यात न आल्याने वर्धा पवनार या मार्गादरम्यानच्या अनेक कडुलिंबाच्या झाडांवर उधळी लागायला सुरुवात झाली आहे. काही झाडांवर तर ही उधळी वरपर्यंत पोहोचली असून संपूर्ण झाडाची साल पोखरून निघत आहे. असेच सुरू राहिल्यास काहीच वर्षात ही झाडे वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा महामार्गच शेतशिवारातून जातो. कपाशीची व सोयाबीनची उलंगवाडी झाल्यावर शेतकरी धुरे व कपाशीची झाडे जाळून टाकतात. ही आग पसरत पसरत रस्त्याच्या कदेला असलेल्या झाडांपर्यंत येतात. त्यामुळे रस्त्यालगतची मोठी झाडे होरपळून करपून जातात. अनेक झाडे तर बुंधा जळाल्याने पूर्णत: वाळून त्यांचे सांगाडे उभे आहेत. ती केव्हा पडतील याचाही नेम नाही. अशी झाडे कापून टाकणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष होत होत आहे. महामार्गावरील झाडांची काळजी घेणे ही रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आतापर्यंत अनेक झाडे वाळली आहे. एकढेच नव्हे तर काही झाडे मुद्दाम वाळविण्यात आल्याचेही निदर्शनास येते. सरपणासाठी याचा उपयोग व्हावा यासाठी हा सारा खटातोप केला जातो. परिणामी कडुलिंबासारखी बहुगुणी झाडे नष्ट होत आहे. ही झाडे रस्त्याने होणारे वाहनांचे प्रदुषण कमी करीत असतात. तसेच सावलीही प्रदान करतात. परंतु नष्ट होत चाललेल्या झाडांमुळे विपरित परिणाम निसर्गावर होत आहे. त्यामुळे या झाडांची काळजी घेण्याची गरज आहे. वर्धा पवनार मार्गावरील अनेक झाडे उधळीमुळे पोखरली जात आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)
उधळीने महामार्गावरील झाडे धोक्यात
By admin | Updated: December 24, 2015 02:47 IST