काव्य बैठकीत घेतला ठाव : विदर्भ साहित्य संघाचा उपक्रमवर्धा : ‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान’ अशी लाघवी मांडणी करणारी तर कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वेदना शब्दांतून मांडणारी काव्यमैफल जयश्री कोटगीरवार यांच्या निवासस्थानी सादर झाली. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेद्वारे या काव्यबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वि.सा. संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित काव्यमैफलीत प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, दिलीप गायकवाड, प्रशांत पनवेलकर, मीनल रोहणकर, मीरा इंगोले, मंजूषा चौगावकर, जयश्री कोटगीरवार आदींनी दर्जेदार रचना सादर केल्या. कार्यक्रमाला वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वय चिटणीस प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाखा सचिव रंजना दाते यांचा सत्कार करण्यात आला. काव्य मैफलीची सुरुवात ‘घडा वाहत असताना’ या कवितेने झाली. ‘कधीही नसतेच सागराइतके आभाळ एकाकी, सागर आणि आभाळ आपल्या सारखेच असते, कुणीतरी पाठशिवणीचा खेळ मांडत असतो नकळत तेव्हा सवंगडीच डाव सोडून जात असतात, घडा वाहत असताना’, असे संदर्भ प्रा. राजेंद्र मुंढे यांनी कवितंतून मांडले. हिंडोलती वाऱ्यावर पार पिंपळ हिरवे, राधा मुरलीची लय सूर लेवती पारवे, याद पुन:पुन्हा यावी वेणू असाच वाजला, आला निर्गुणाला गुण धुंद गोविंंद नाचला’ अशी लय प्रशांत पनवेलकर साधली. कितीतरी तुझी रूपं तुझ्याच चित्रांसारखी, तुझ्या चित्रांवर रेखाटते मी कविता मनासारखी, अशा शब्दात मंजूषा चौगावकर यांनी काव्यप्रेरणेला व्यक्त केले. ‘विसर पडूनही न पडावा अशीच करून ठेवली साठवण आणि माझ्या एकटेपणावरचा उतारा तुझी एकेक आठवण’, अशा चारोळीवजा कविता ज्योती भगत यांनी सादर केल्या. ‘भिववित आली आज मनाला ही संध्याछाया, विराण झाले जग हे सारे थरथरली काया...शोककळाही निरवेल आणिक होईल रम्य पहाट’, असा आशावाद जयश्री कोटगीरवार यांनी लयबद्ध कवितेतून मांडला. दिलीप गायकवाड यांनी पायथ्यातुनी वरवर चालत जाता येते, वेदना जरी उरी बासरीत गाता येते’ ही गझल सादर केले. संजय इंगळे तिगावकर यांनी कुलूप, काही संदर्भ आणि ‘कोहम’ या कविता सादर केल्या. याप्रसंगी कल्पना माळोदे, रंजना दाते, प्रद्युम्न चौगावकर, गौरी कोटगीरवार यांनी अन्य कविंच्या कविता आणि गीतेही सादर केलीत. काव्यमैफलीचे संचालन कोटगीरवार यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या व्यथांचा कवितांतून घेतला वेध‘माझा शेतकरी राजा धुरा धुरा तपासतो, कुठे फुटलेला बांध मातीगोट्याने बुजवितो, फुटलेले आयुष्य परी त्याला सांघता न आले, अवघ्या जीवनाचे त्याच्या मातेरे झाले’ ही शेतकऱ्यांची व्यथा मीर इंगोले यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी ही कविता सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.मीनल रोहणकर यांनी ‘जेव्हा त्याची चिता जळत होती, मला भविष्याची चिंता जाळत होती, आत्महत्येने त्याचे प्रश्न सुटले होते, मी मात्र उत्तर शोधत होते’, असे शेतकऱ्याच्या विधवेचे मनोगत मांडले. ‘वाटतं असं जगावं पण, आपलं चिल्लर खुर्दा आयुष्य, गल्लीतही टिकेल की नाही, त्याचं काय करावं?’ अशी वर्तमानकालीन खंत दत्तानंद इंगोले यांनी कवितेतून व्यक्त करीत ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला.
‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान...’
By admin | Updated: October 9, 2016 00:38 IST