पांघरुणामुळे डासांना प्रतिबंध : जाड कपडेही ठरतात उपयोगीयवतमाळ : जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील गर्दीही बऱ्यापैकी ओसरली आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली होती. यातील बहुतांश रुग्ण व्हायरल फिवरचे होते. यासोबतच जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावर्षी डेंग्यूने दोन रुग्णांचा तर तापाने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. डेंग्यूचे संशयित म्हणून एक हजार ४०० रुग्णांचे रक्त नमुने घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली गेली. त्यात १०४ रुग्णांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आढळून आले. त्यांना वेळीच उपचार करून यातून बाहेर काढले गेले. विविध प्रकारच्या तापाची साथ आतापर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील १६ उपजिल्हा रुग्णालये, ४६५ आरोग्य उपकेंद्र आणि ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रात तापाच्या रुग्णांची नोंद घेतली गेली. शासकीय रुग्णालयात दरदिवशी ओपीडीमध्ये नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २० टक्के रुग्ण हे विविध प्रकारांच्या तापाचे असल्याचे तपासणीत आढळून आले. गेली काही महिने यवतमाळ जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ २० टक्के एवढा होता. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे हा फिवर रेट १२ टक्क्यांनी कमी होवून आठ टक्क्यांवर आला आहे. थंडी आणखी वाढताच हा ‘फिवर रेट’ एक-दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. ‘फिवर रेट’ कमी होण्यासाठी थंडी सर्वाधिक उपयोगी ठरली आहे. कारण थंडीमुळे नागरिक अंगावर जाड कपडे घालतात. झोपताना पूर्णवेळ अंगावर पांघरूण राहते. त्यामुळे डास चावत नाही. पर्यायाने डेंग्यू व तापाची लागण होत नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत हिवताप विभागाने खास सप्ताह राबवून फॉगिंग, कोरडा दिवस, नाल्या वाहत्या करणे, उकिरडे गावाबाहेर हलविणे आदी उपक्रम घेतले. त्याचा फायदा नागरिकांच्या आरोग्यासाठी होत असल्याचे सांगण्यात आले. हिवताप विभागाला निधी, वाहनांची अडचण असल्याने अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास अडचण येत असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली. (जिल्हा प्रतिनिधी)
थंडीमुळे जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांवर
By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST