दुरूस्तीकडे दुर्लक्ष : रुबा चौक ते तेलंगखडी आणि रेल्वे मार्गावरील प्रकारहिंगणघाट : शहरातील काही प्रमुख मार्गांवर रस्त्यांचे बांधकाम करतानाच दुभाजकांची निर्मिती करण्यात आली होती; पण यानंतर त्याकडे कधीही लक्ष देण्यात आले नाही. परिणामी, शहरातील काही रस्त्यांवरील दुभाजक सपाट झाले असून वीज खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. पालिका प्रशासन आणि बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील रूबा चौक ते तेलंगखडी या रस्त्याचे कित्येक वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. या मार्गावर रस्ता दुभाजक बांधून त्यावर पथदिवे लावण्यात आले होते. सध्या हे रस्ता दुभाजक दिसेनासेच झाले आहेत. अनेक ठिकाणी दुभाजक सपाट झाले तर काही ठिकाणी थोडे अवशेष शिल्लक दिसतात. असाच प्रकार रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरही पाहावयास मिळतो. दुभाजकच राहिले नसल्याने रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब उभारल्याचा भास होतो. परिणामी, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)वाहतूक झाली अस्ताव्यस्तशहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, कुठलीही वाहने कुठेही वळण घेऊ नयेत म्हणून रस्ता दुभाजकांची निर्मिती केली जाते; पण शहरातील बहुतांश रस्त्यांवरील दुभाजकच सपाट झाल्याने मुख्य उद्देशच सफल होत नसल्याचे दिसून येत आहे. दुभाजक नसल्याने वाहन धारक कुठूनही कशीही वाहने वळवितात. परिणामी, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुभाजक रस्त्याशी समतल झाल्याने वाहतुकीचा पचका झाला आहे. पूर्वी दुभाजक संपल्यानंतरच वाहने वळविली जात होती; पण आता मधूनच वाहने वळत असल्याने अपघाताचा धोका असतो. या मार्गावर वाहतूक पोलीसही आढळून येत नसल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे लक्ष देणार कोण, मोठा अपघात झाल्यानंतरच कार्यवाही होणार काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत.
दुभाजक सपाट, रस्त्यातच विद्युत खांब
By admin | Updated: June 10, 2016 02:12 IST