वर्धा : नाचणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक सहा येथे विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. या भागातील लहानुजीनगर येथील नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देत समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परिसरात येथे सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने दुर्गंधी पसरल्याने नागरिक बेजार झाले आहेत. यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. सांडपाण्यासाठी असलेल्या काही नाल्या कचऱ्याने भरल्या आहेत. त्यामुळे त्यातून सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. परिणामी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती देण्यात आली तरी नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. सांडपाणी वाहून जात नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते आहे. यात रस्त्याची अवस्था दयनीय होत आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय परिसरातील काही नागरिकांकडे पशुंचे गोठे आहे. त्यामुळे निर्माण होत असलेल्या मलमुत्राने दुर्गंधीत भर पडत आहे. येथे नाल्या नसल्याने घाणीचा निचरा होत नाही. ही घाण रस्त्यावर येत असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे डासांच्या उत्पत्तीला वाव मिळत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी येथे नाल्याची सफाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना सतीश रोहणकर, मोहम्मद साबीर पटेल, अविनाश पारिसे, महादेव कुयटे, रवींद्र पारिसे, नारायण पाचरकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
नाचणगावात नानाविध समस्यांचे थैमान
By admin | Updated: July 11, 2015 02:42 IST