लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात बंदी असलेल्या दीव-दमण येथील विदेशी दारू शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील विविध दारू विक्रेत्यांकडे विकण्यात येत आहे. दीव-दमणच्या दारू बाटलीचे स्टीकर बदलवून त्यावर 'ओन्ली महाराष्ट्र'चे स्टीकर लावून जादा दरात या बनावट मद्याची खुलेआम विक्री होताना दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे धक्कादायक वास्तव दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
दमण हे गुजरात सीमेलगत असल्याने, गुजरातमधील दारूबंदीमुळे लोक तेथे जाऊन खरेदी करतात. वर्धा जिल्ह्यात ही दारू ट्रक किंवा वैयक्तिक वाहनांनी आणली जाते. महाराष्ट्रात दारूवर उच्च कर असल्याने दमणची दारू अवैधपणे आयात केली जात आहे. वर्धा जिल्हा १९७४ मध्ये दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे; मात्र ही दारूविक्री केवळ कागदावरच राहिली असून यामुळे शासनाचा दररोज कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. पोलिस विभागाने दारूविक्रीवर काहीअंशी पायबंद घातला असला तरी पूर्णतः दारूविक्रीवर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ते विशेष. ही दारू आरोग्यासाठी देखील घातक ठरत आहे. कारण काही प्रमाणात ती अवैध किंवा निम्न दर्जाची असते. ज्यात मिथेनॉलसारखे विषारी पदार्थ मिसळलेले असू शकते. हे देखील तितकेच खरे.
मिथेनॉल विषबाधा...
अवैध दारूमध्ये मिथेनॉल मिसळले असल्याने अंधत्व किंवा मृत्यू होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अशा प्रकरणांमुळे शेकडो मृत्यू होतात. मागील काही वर्षांचा विचार केल्यास विषारी दारूमुळे जवळपास शंभरावर जणांचा मृत्यू होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले असल्याचे वास्तव एकट्या वर्धा जिल्ह्यात आहे.
आरोग्यावर होतात विपरीत परिणाम...
दमणची दारू स्वस्त असली तरी तिच्या दर्जामुळे आरोग्याचे धोके वाढत आहेत. दारू व्यसनामुळे होणारे आजार देखील वाढत चालले आहेत. सतत दारू पिल्याने यकृतावर डाग पडतात. फायब्रोसीस होतो आणि कर्करोगाचा धोकाही वाढतो.
बनावट दारू कशी बनते ?
बनावट दारू ही मुख्यतः खराब दर्जाच्या किंवा विषारी रसायनांपासून तयार केली जाते. सामान्यतः इंडस्ट्रियल अल्कोहोल जसे की मिथेनॉल मिसळून स्वस्तात तयार केली जाते, जी मानवी शरीरासाठी घातक आहे. ही दारू खरी बॅन्ड्सची नक्कल करून पॅकेज केली जाते. बॉटल, लेबल, झाकण सगळे बनावट असतात. विक्रीसाठी ही दारू किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचते आणि तेथून खुल्या बाजारात, हॉटेल्स, किंवा इतर ठिकाणी विकली जात आहे.
धोत्रा फाटा, सालोड बायपासवरून हेराफेरी ?
दीव-दमण, हरयाणा येथील स्वस्तातील दारू वर्धा शहरासह जिल्ह्यात विकली जात आहे. हा दारूसाठा थोत्रा फाटा तसेच सालोड हिरापूर गावापासून गेलेल्या बायपास मार्गावर ट्रकमधून उतरतो. याठिकाणी शहरातील काही किरकोळ दारूविक्रेते आपल्या वाहनाने जात तेथून दारूसाठा घेत नागरिकांना जादा दरात 'स्टीकर' बदलवून विक्री करत असल्याचे बोलले जात आहे.
'नॉट फॉर सेल', एक्साईज ड्यूटी लागते कमी
केंद्र शासित असलेल्या दीव दमण येथील दारूवर एक्साईज ड्यूटी कमी आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रात विकणाऱ्या दारूवर दुप्पट कर असल्याने दारूविक्रेते येथील दारू आणत 'स्टीकर' बदलून जादा दरात विकत आहे. दमण येथील एक दारूची बाटली जागेवर २५ रुपयाला मिळते ती बाटली वर्धा शहरासह जिल्ह्यात ३७० रुपयांला विकली जात आहे.
'अर्थ'कारणातून 'डोळे' बंद
शहरात आजही मोठ्या प्रमाणात दारूची खुलेआम विक्री होत आहे. काही जण 'चोरीछुपे' दारू 'पार्सल' देत आहेत. ही बाब स्थानिक पोलिसांना माहिती असतानाही त्यांच्याकडे 'अर्थ'पूर्ण कारणातून डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत जीवावर बेतणारी दारू हद्दपार करण्याची गरज आहे.