लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन... लॉकडाऊनच्या ४४ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून काही दुकाने उघडण्याबाबत थोडी शिथिलता...त्यानंतर लॉकडाऊनचा ४५ वा बुधवार हा दिवस उजाडला अन् वर्धेकरांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे धाव घेतली. यामुळे काही ठिकाणी नागरिकांची थोडी गर्दी झाली होती. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. एकूणच शिथिलतेनंतर जनजीवन पुर्वपदाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे बघावयास मिळाले.बुधवारी दिवस उजाडल्यानंतर वर्धेतील व्यावसायिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत आपली मोबाईल शॉपी, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीक, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, जनरल स्टोअर्स, बुक स्टॉल, झेरॉक्स, भांड्याची दुकाने, चप्पल-जोड्याची दुकाने, ऑटोमोबाईल्स, गॅरेज, स्पेअर पार्ट, प्रिंटींग, वेल्डिंग, ई-सेवा केंद्र, कापड व रेडिमेट कपड्याची दुकाने उघडली. जसजसा सुर्यनारायण डोक्यावर येत होता तस तसे नागरिक विविध साहित्याची खरेदी करून घरचा रस्ता धरत होते. बजाज चौकतून शिवाजी चौककडे जाणारा मार्ग दक्षता म्हणून बंद करण्यात आल्याने सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील दुर्गा टॉकीज मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. विशेष म्हणजे हा परिसर वर्धा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर मुख्य मार्गावरील ठाकरे मार्केट चौकात बाजारेपठेतील गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेटस् लावण्यात आले होते. शिवाय तेथे पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून तसेच कुठलीही अनुचित परिस्थिती ओढावल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे म्हणून सोशालिस्ट चौकातून सराफा लाईनकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच मुख्य बाजारपेठेतील आणखी काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बॅरिकेटस् लावण्यात आले होते. बुधवारी व्यावसायिकांनीही त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानासमोर ग्राहकांना हात धुण्याची सुविधा तसेच सॅनिटाइजर ठेवले होते. हात निर्जंतुक केल्यावरच ग्राहकांना दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवेश दिल्या जात होता. तर काही दुकानांमध्ये अचानक गर्दी वाढल्याने आणि दुकाने छोटी असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे बघावयास मिळाले.
शिथिलतेनंतर जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST
बजाज चौकतून शिवाजी चौककडे जाणारा मार्ग दक्षता म्हणून बंद करण्यात आल्याने सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील दुर्गा टॉकीज मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. विशेष म्हणजे हा परिसर वर्धा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर मुख्य मार्गावरील ठाकरे मार्केट चौकात बाजारेपठेतील गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेटस् लावण्यात आले होते.
शिथिलतेनंतर जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने
ठळक मुद्दे४५ दिवसांनंतर दुकाने उघडली : काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन तर काही ठिकाणी उडाला फज्जा