लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आई-वडिलांच्या सततच्या भांडणाने त्रस्त झालेल्या एका अल्पवयीन मुलीने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. मात्र, आता मृत मुलीच्या आईने स्वतःच्या पतीविरोधात सावंगी (मेघे) पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. वडिलांच्या विकृत वागण्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या तक्रारीमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुषमा अरुण वानखेडे असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे.
सुषमा यांचा पती डॉ. अरुण उत्तम वानखेडे (वय ४४, रा. ड्रिमलॅण्ड सिटी, सावंगी, मेघे) मध्य प्रदेशातील एका आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तात्पुरती नोकरी करतो. १३ फेब्रुवारी २००५ रोजी दोघांचा विवाह झाला आणि १७ सप्टेंबर २००७ रोजी त्यांना नक्षत्रा नामक मुलगी झाली. लग्नानंतर काही दिवसापासूनच सुषमा यांचा नणंदेकडून छळ सुरू झाला. अरुणलाही दारूचे व्यसन असल्याने तो विकृतासारखा वागू लागला. भोपाळवरून तो अधूनमधून वर्ध्याला यायचा. अरुण काही महिलांच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यावर त्याला विचारण्याचा प्रयत्न केला असता तो दोन्ही माय-लेकींना दारूच्या नशेत जबर मारहाण करायचा. यातूनच घरामध्ये वादाला सुरुवात झाली. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली, परंतु वागणुकीत सुधारणा झाली नाही. त्याच्या संपर्कातील महिला माय-लेकीना फोन करून अश्लील शिवीगाळ करायची. अरुणकडून वाईट वागणूक मिळायला लागल्याने मुलीच्या मनावर परिणाम झाला. यातूनच तिने घरीच ६ डिसेंबरला आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
घटनेपासून बाप झाला बेपत्ता
- अरुणने २९ नोव्हेंबरला दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी माय-लेकींना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नाही तर घरात हेलियम सिलिंडर मागवून ते कसे वापरायचे याचा व्हिडिओ मुलीच्या मोबाइलवर पाठविला.
- याच सिलिंडरचा वापर करून मुलीने आत्महत्या केली. त्यामुळे अरुणनेच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुषमा वानखेडे यांनी तक्रारीतून केला आहे. इतकेच नाही तर घटनेपासून तो गायब असल्याने मुलीच्या मृत्यूपश्चात सर्वच विधी सुषमा यांनीच पार पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
"वडिलांच्या त्रासापायीच मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार सुषमा अरुण वानखेडे यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली असून, चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल."- पंकज वाघोळे, ठाणेदार, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे)
Web Summary : A minor girl, harassed by parental fights and father's perverted behavior, committed suicide. The mother accuses the father of driving her daughter to suicide, alleging abuse and sending instructions on using helium. Police are investigating.
Web Summary : माता-पिता के झगड़ों और पिता के विकृत व्यवहार से तंग आकर एक नाबालिग लड़की ने आत्महत्या कर ली। मां ने पिता पर बेटी को आत्महत्या के लिए उकसाने का आरोप लगाया है, जिसमें दुर्व्यवहार और हीलियम का उपयोग करने के निर्देश भेजने का आरोप है। पुलिस जांच कर रही है।