वर्धा : विधानसभा निवडणुकांचा बिगुल फुंकला गेला आणि अपक्षांनी बाशिंग बांधून रिंगणात उडी घेतली़ यातील कुणालाही आपले अनामत जप्त तर होणार नाही ना, याची भीती नसल्याचेच एकूण प्रचारावरून दिसून आले़ अखेर व्हायला नको तेच झाले़ वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघ मिळून तब्बल ६२ उमेदवारांना आपले अनामतही वाचविता आले नाही़ यात अपक्षच नव्हे तर विद्यमान आमदार आणि राजकीय पक्षांच्या उमदेवारांचाही समावेश असल्याचे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे़अनामत रक्कम वाचविण्याकरिता मतदार संघामध्ये झालेल्या एकूण वैध मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळविणे गरजेचे असते़ यात जिल्ह्यातील तब्बल ६२ उमेदवारांना अपयश आले़ यामुळे त्यांच्यावर अनामत रक्कम जप्तीची नामुष्की ओढवली आहे. यात दोन विद्यमान आमदारांसह माजी आमदार व दिग्गजांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत चार मतदार संघातून ६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी ७ उमेदवारांना ‘डिपॉझिट’ ‘सेफ’ करता आले आहे. रविवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केवळ सातच उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकले. यापैकी चार विजयी उमेदवार आहेत. हिंगणघाट मतदार संघात तर विजयी उमेदवार समीर कुणावार यांनी घेतलेल्या मताधिक्याची टक्केवारी अधिक असल्याने उर्वरित सर्वच उमेदवारांचे ‘डिपॉझीट’ जप्त झाले. आर्वी मतदार संघात दुरंगी लढतीमुळे दोन उमेदवारांमध्येच मतांची विभागणी झाली़ यामुळे १३ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्तीची नामुष्की ओढवली आहे़ येथे प्रत्येक उमेदवाराला २८ हजार ३६८ मते मिळविणे गरजेचे होते. देवळी मतदारसंघात दुरंगी लढत झाल्याने विजेता आणि उपविजेता उमेदवार वगळता १७ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले. वर्धा मतदार संघात उमेदवारांमध्येच मताधिक्य मिळविण्यासाठी चुरस दिसून आली असली तरी केवळ दोनच उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकले आहे़ २१ पैकी १९ उमेदवारांना एकूण वैद्य मतांपैकी २७ हजार ६८६ मते मिळविता आली नसल्याचेच दिसून आले़(स्थानिक प्रतिनिधी)
आमदारांसह ६२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By admin | Updated: October 20, 2014 00:00 IST