गौरव देशमुख - वायगाव (नि.)शासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीमुळे अनेक ठिकाणी मृत व्यक्ती जिवंत असल्याच्या नोंदी आहे. त्यांच्या नावे अनेक योजनांचा लाभ उचलल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र हिंगणघाट तालुक्यातील सावली (सास्ताबात) येथील एका जिवंत महिलेला मृत दाखविण्याचा प्रताप गावच्या पटवाऱ्याने केला आहे. या महिलेचे नाव मेहरूम जयरूद्दीन शेख असे आहे. शासकीय कागदपत्रावर ती मृत असल्याने तिला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. गत सहा महिन्यांपासून या महिलेला निराधार योजनेतून मिळणारी पेन्शन बंद झाल्याने तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तिला आता जिवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. हा पुरावा गोळा करण्याकरिता ती पटवाऱ्याकडे गेली असता पटवारी गावात येत नसल्याचे तिला सांगण्यात आले आहे. जिवंत राहण्याकरिता शासनाने दिलेल्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने वृद्धावस्थेत काय करावे असा प्रश्न तिच्या समोर उभा आहे. शिवाय ती जिवंत असताना तिला पटवाऱ्याने मृत घोषित करण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पटवाऱ्याच्या प्रतापाने जिवंत महिला झाली मृत
By admin | Updated: December 9, 2014 22:54 IST