धोपा अन् बेशरच्या झाडांचा विळखा : पालिकेने लक्ष देण्याची गरज वर्धा : शहरातील महावीर उद्यानात विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देत स्थानिक पालिका प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. असे असले तरी शहरातीलच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या देखभाल व दुरूस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील सदर उद्यानाची अल्पावधीतच दैनावस्था झाली आहे. तेथील संरक्षण भिंतीसह अनेक साहित्य तुटले असून या उद्यानाच्या देखभाल-दुरूस्तीकडे वर्धा पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्याच नावाने शहरातील सेवाग्राम मार्गावरील उद्यान तयार करण्यात आले होते. सदर उद्यानाची निर्मिती व सौदर्यीकरण करताना मोठ्या प्रमाणात निधीही खर्च करण्यात आला होता. या उद्यानात फिरायला येणाऱ्या बालगोपालांच्या मनोरंजनासाठी तत्कालीन परिस्थितीत येथे काही ठिकाणी विविध प्रकारचे झुलेही लावण्यात आले होते. परंतु, सध्या उद्यानातील लहानमुलांसाठी असलेले बहुतांश झुले तुटले आहे. या उद्यानात मोकाट जनावरांचा मुक्त संचारही होत असून ठिकठिकाणी जंगली धोपा व बेसरमाची झाडे वाढली आहे. झुडूपी परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वापर असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे उद्यान परिसरात वाढलेली झुडूपे एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारीच ठरत आहे. उद्यानाच्या संरक्षण भिंतीसह उद्यानाचे मुख्य द्वारही तुटले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा या भागात नेहमीच डेरा असतो. हरित वर्धा या संकल्पनेला पुर्णत्त्वास नेण्यासाठी या उद्यानाचे नव्याने सौदर्यीकरण करून येथे आवश्यक त्या सोई-सुविधा देण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी) झुडपांमुळे अनुचित घटनेची भीती उद्यान परिसरात ठिकठिकाणी झुडूपे वाढली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एक विहीर असून विहिरीच्या आजूबाजूला बऱ्यापैकी झुडूपे वाढली आहे. झुडूपांमुळे विहिरही सहज दिसत नाही. तसेच झुडूपात सरपटणाऱ्या जनावरांचा संचार असल्याने अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे. चोरट्यांना मिळतेय आयती संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची सध्या दैनावस्था झाली आहे. सदर उद्यानात येणाऱ्या मुला-मुलींच्या मनोरंजनासाठी तत्कालीन परिस्थितीत ठिकठिकाणी विविध झुले लावण्यात आले होते. परंतु, ते सध्या तुटलेले आहेत. सदर तुटलेले लोखंडी साहित्य बेवारस स्थितीत पडून असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, चोरट्यांना चोरीची आयतीच संधी मिळत आहे.
अल्पावधीत उद्यानाची झाली दैना
By admin | Updated: May 4, 2017 00:50 IST