कारंजा (घाडगे): तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग असो की जि.प., पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरील कामे ई-टेंडरींगव्दारे मंजूर केली जातात. ही कामे मिळण्याकरिता दिवसेंदिवस कंत्राटदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. यात कंत्राटदार दर पाडून कंत्राट घेत असल्याने कामांचा दर्जा खालावत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या कामावरून हे स्पष्ट होत आहे. सध्या कारंजा तालुक्यातील काही गावांची मोठ्या रकमेची डांबरी रस्त्याची कामे मंजूर आहेत. यात सेलगांव (उमाटे) ते धामकुंड, गवंडी-कारंजा, उमरविहरी-धानोली ही कामे मंजूर आहेत. या कामाकरिता अंदाजे ५८ लक्ष रुपयांचे इस्टिमेट आहे; परंतु ही कामे २५ टक्के कमीने ई-टेंडर मध्ये घेण्यात आली. सेलगाव (उमाटे) १७ लक्ष, गवंडी २० लक्ष, उमरविहरी २१ लक्ष, असे एकूण ५८ लक्ष रुपयांची कामे देण्यात आली आहेत.ही काम आता २५ टक्के कमी म्हणजे ४३ लक्ष रुपयात करावयाची आहेत. वाढत्या महागाईमुळे खरच एवढ्या रकमेत दर्जेदार काम होईल काय, असा प्रश्न आता समोर येवू लागला आहे. (शहर प्रतिनिधी)
कमी दरात काम घेतल्याने दर्जाहीन रस्ते
By admin | Updated: February 23, 2015 01:46 IST