जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 05:00 AM2021-09-04T05:00:00+5:302021-09-04T05:00:30+5:30

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे.

Crop registration on the app shown by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी

जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सात-बारावर स्वतः करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी ॲप’ सुरू केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाइलच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद कशी करावी, याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वतः बरबडी येथे जावून शेतकऱ्यांना करून दाखवले. जिल्हाधिकारी थेट शेतापर्यंत आल्याने बरबडी येथील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्यच संचारल्याचे बघावयास मिळाले.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. १३ ऑगस्टला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे ॲप कार्यान्वित करण्यात आले असून, ॲपबाबत शेतकऱ्यांना नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या समस्या जाणवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथे सोनोबा गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात जात शेतातील पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमध्ये करून दाखवली. शेतात टमाटर, वांगी आणि दोडके या पिकाची नोंद घेण्यासोबतच त्यांच्या शेतातील सिंचन सुविधेचीसुद्धा नोंद ॲप मध्ये करून दिली. तसेच प्रभाकर लेंडे या शेतकऱ्याच्या शेताचीही पाहणी करून ॲपमध्ये उभ्या पिकाची नोंद करण्यात आली. यावेळी बरबडीच्या सरपंच संगीता शिंदे, उपविभागीय महसूल  अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत आदींची उपस्थिती होती.
ॲप शेतकऱ्यांकरिता अतिशय सोपेच
ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अतिशय सोपे असून, यामध्ये शेतकरी कधीही त्यांच्या खरीप, रबी व उन्हाळी पिकाची नोंद घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

एका मोबाईलद्वारे २० शेतकऱ्यांच्या पिकाची घेता येते नोंद
एका मोबाईलवरून २० शेतकऱ्यांची पिकाची  नोंद घेता येते. त्यामुळे ॲण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइलवरून  इतर शेतकऱ्यांच्या पिकाची  नोंद करून देण्यासाठी पुढाकार घेण्यासोबतच तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्यात.

 

Web Title: Crop registration on the app shown by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.