मद्यपी थोडक्यात बचावला : वेळीच उपचाराने प्राण वाचलेआर्वी : वर्धमनेरी येथे एका गृहस्थाच्या घरी साप निघाला होता. तो साप पकडण्याचे सर्पमित्र प्रयत्न करीत होते. याच वेळी गावातील प्रभाकर नेहारे नामक युवक नशेत तेथे आला. नशेतच त्याने मी साप पकडतो असे म्हणून साप असलेल्या कवलाच्या ढिगाऱ्यात हात घातला. हात घालताच सपाने चावा घेतला. यावेळी उपस्थित सर्पमित्रांनी त्याला वेळीच रुग्णालयात नेल्याने त्याचे प्राण वाचविले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.आर्वी लगत असलेल्या वर्धमनेरी येथे साप निघाल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी सर्पमित्र मनीष ठाकरे यांना दिली. ठाकरे यांच्यासह शुभम जगताप, सुरज विरपावे हे साप पकडण्याकरिता वर्धमनेरीला पोहचले. वर्धमनेरी येथे पोहचल्यानंतर सदर साप हा विषारी नाग असल्याचे आढळून आले. सदर साप झाडावर असल्याने प्रथम त्याला झाड हालवून खाली पाडले. खाली पडताच तो साप कवेलूंच्या ढिगाऱ्यात गेला व तेथेच लपून बसला. त्याला बाहेर काढण्याची सर्पमित्रांची कसरत सुरू असतनाच गावातीलच प्रभाकर नेहारे हा युवक नशेत घटनास्थळी आला व सापाला मी पकडतो असे म्हणत त्याने थेट कवेलूच्या ढिगाऱ्यात हात टाकला. हात टाकताच नागाने त्याला दंश केला. दंश झाल्याने समजताच त्या युवकाने साप प्राणीमित्रांच्या अंगावर फेकले. त्यानंतर प्राणीमित्रांनी १५ मिनिटांच्या परिश्रमानंतर साप ताब्यात घेतला. सर्पदंश झाल्याने प्राणीमित्रांनी तिथे जमलेल्या नागरिकांना नेहारे याला रुग्णालयात उपचाराकरिता नेण्याचे म्हटले; परंतु कोणीच प्रतिसाद न दिल्याने प्राणीमित्रांनी सदर युवाकास उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात नेले. येथे वेळीच सदर युवकावर उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचले. यावेळी सर्पमित्र अर्थव मोहदेकर, संकेत वनस्कर, आकाश ठाकरे, अंकुश जाऊरकर यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
अन् साप पकडण्याचे धाडस अंगलट आले
By admin | Updated: October 2, 2016 00:45 IST