वर्धा : शेतीची मशागत करून पेरणीकरिता पावसाकडे डोळे असलेल्या बळीराजाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाला प्रारंभ झाला. आलेला पाऊस दमदार नसला तरी तो कपाशीच्या लागवडीकरिता ठीक असल्याचे म्हणत बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड करणे सुरू आहे. यात ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पाऊस येण्यापूर्वीच लागवड केली आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला तरी गत हंगामात पावसाने डोळे वटारल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामुळे गत हंगामात आलेला अनुभव हाताशी घेत जिल्ह्यातील शेतकरी सावधानता बाळगत असल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या पहिल्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी केवळ कपाशीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनची पेरणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी अद्याप सुरुवात के ली नसल्याचे चित्र आहे. गत हंगामाप्रमाणे यंदा जर पुन्हा पावसाने डोळे वटारले तर मोठे नुकसान सहन करण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हिंमत नाही. यामुळे प्रारंभी केवळ कपाशीची लागवड करणे सुरू आहे. जर पावसाने डोळे वटारले तर कपाशीचे बियाणे पुन्हा विकत घेणे परवडणारे आहे; मात्र यात जर सोयाबीनला मोड आली तर ते बियाणे मिळणे कठीण जाण्याचे संकेत आहेत. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदा शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणेही शिल्लक नाही. यामुळे दमदार पाऊस आल्याशिवाय सोयाबीनचा पेरा नको, असे म्हणत शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख हेक्टरवर विविध पिकांचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात नमूद आहे. यात कपाशीचा पेरा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात २ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाने आराखड्यात म्हटले आहे. या व्यतिरिक्त सुमारे दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गत हंगामात सोयाबीन झाले नसल्याने यंदाच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण झाल्याने कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वी तर काही शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्या सरी पडताच कपाशीची लागवड करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
कपाशीची लागवड सुरू
By admin | Updated: June 15, 2015 02:13 IST