लागवडीवरचा खर्च दोन लाखांचा; हाती आले केवळ चाळीस हजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:38 AM2021-05-18T08:38:23+5:302021-05-18T08:39:55+5:30

Wardha news आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

The cost of cultivation is two lakhs; Only forty thousand came to hand | लागवडीवरचा खर्च दोन लाखांचा; हाती आले केवळ चाळीस हजार 

लागवडीवरचा खर्च दोन लाखांचा; हाती आले केवळ चाळीस हजार 

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाकवडीमोल भावाने टरबजू-खरबूज उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने युवकांना गावाचा रस्ता धरावा लागला. आता गावातील शिक्षित युवकांनी नोकरीकरिता बाहेर पडण्यापेक्षा आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

सेलू तालुक्यातील धपकी येथील युवा शेतकरी महेश महादेव गजबे याने एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. या पदवीच्या भरवशावर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा त्याने वडिलोपार्जित साडेतीन एकर शेतीमध्ये टरबूज आणि खरबुजाची लागवड केली. उन्हाळ्यात या दोन्ही पिकांना मोठी मागणी राहत असल्याने त्याने या पिकांसाठी चांगलीच मेहनत घेतली. फळबागही चांगली बहरल्याने आता चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास निर्माण झाला होता. फळ तोडणीस आले आणि कडक लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे बाजारपेठ बंद असल्याने फळविक्रीला ब्रेक लागला आहे. याच संधीचा गैरफायदा उचलून व्यापारी दोन ते तीन रुपये प्रतिकिलो प्रमाणे मागणी करीत आहे. पण, पर्याय नसल्याने मिळेल त्या दरात टरबूज व खरबूज विकावे लागल्याने युवा शेतकऱ्याला केवळ चाळीस हजार रुपये प्राप्त झाले आहेत. याकरिता त्याला दोन लाख रुपयांचा खर्च आला असून कवडीमोल भावामुळे तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

आता कर्जाची परतफेड करणार कशी?

महेशने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पाऊल टाकले होते. त्याने शेतात सुरुवातीला कापूस, सोयाबीन, चणा व तुरीचे पीक घेतले. निसर्गकोपामुळे या पिकांमध्येही मोठा फटका बसला. त्यामुळे दोन बँकांकडून घेतलेले २ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी दोन एकरात टरबूज तर दीड एकरात खरबुजाची लागवड केली. शेत बहरले, पीकही चांगले आलेत पण, कडक निर्बंधामुळे सारेकाही धुळीस मिळाले. दोन लाखांचा खर्च करून केवळ चाळीस हजार रुपये हातात आल्याने कर्ज फेडण्यासाठी केलेला प्रयत्न कर्ज वाढीस कारणीभूत ठरला. त्यामुळे या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.

जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परंपरागत पीक घेऊन शेती परवडत नाही, असा आम्हा नव्या पिढीतील शेतकऱ्याचा तोरा होता. म्हणून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पाहत आहे. परंतु आमच्याही हाताला यश नसल्याचा अनुभव आला आहे. नव्या पिढीला शेती करण्याचे जीवावर येते, असा आरोप होतो. पण, चांगल्या प्रकारे शेती करूनही अस्मानी-सुलतानी संकटामुळे नुकसानीचाच सामना करावा लागतो. आता चांगले पीक आले असतानाही कवडीमोल भावात विकावे लागत आहे. काढणीचाही खर्च निघत नसल्याने उभ्या पिकावर नांगर चालवायची वेळ आली आहे. आता जुने कर्ज कुठून फेडावे आणि नवीन हंगामाची तयारी कशी करावी?

महेश महादेव गजबे, युवा शेतकरी, धपकी

Web Title: The cost of cultivation is two lakhs; Only forty thousand came to hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती