पैसा गेला पाण्यात : अर्धवट बांधकामात चालतात अवैध व्यवसायवर्धा : नाट्य चळवळीला गती मिळावी, रसिकांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून नगर पालिकेद्वारे काही वर्षांपूर्वी सांस्कृतिक भवन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते; पण हे काम अर्धवट सोडण्यात आले. या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचा तिढा अद्यापही कायमच आहे. यामुळे झालेला खर्च पाण्यातच गेल्याचे दिसते.ठाकरे मार्केट परिसरातील पालिकेच्या जागेवर लोकमान्य टिळक शाळेच्या प्रांगणात पालिका प्रशानाकडून सांस्कृतिक भवनाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. या बांधकामाचा भूमिपूजन सोहळाही मंत्र्यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. बांधकामाला प्रारंभ झाला आणि मधेच बंद पडले. तेव्हापासून बांधकाम रखडलेलेच आहे. अर्धवट बांधकामावर झालेला खर्च पूर्णत: व्यर्थ ठरला असून त्याचे कुणालाही सोयरसुकत नसल्याचेच दिसते. यानंतर बांधकाम पूर्ण करण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नाही.परिणामी, हे अर्धवट बांधकाम अवैध व्यवसायांचे माहेरघर बनले आहे. येथे जुगार, गंजीफा खेळला जात असून मद्य व इतर अंमली पदार्थांच्या सेवनाकरिताही या जागेचा वापर होत असल्याचे दिसते. याच परिसरातील दारूविक्रेत्यांकडून सुरक्षित स्थळ म्हणून दारूसाठा ठेवण्याकरिताही जागेचा वापर होत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भवनाच्या बांधकामापूर्वी या प्रांगणावर राजकीय सभांसोबतच लग्नसोहळे व अन्य कार्यक्रम होत असत; पण आज केवळ जागा गुंतल्याने या समारंभानाही ब्रेक लागला आहे.ना इमारत पूर्ण झाली ना प्रांगण राहिले, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना दिसतात. सत्ताबदल झाल्यानंतरही भवन बांधकामाचा प्रश्न रेंगाळतच आहे. कुण्याही लोकप्रतीनिधीने भवनाच्या पूर्णत्वासाठी पावले उचलल्याचे ऐकिवात नाही. यामुळे आंबटशौकिनांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते. दिवसा येथे मद्याचे प्याले रिचविले जातात तर रात्रीला येथून गांजाचा धूर निघताना दिसतो. रात्री या इमारत परिसरातील चित्र काही वेगळेच असते. याकडे लक्ष देत अवैध व्यवसायांना आळा घालावा तसेच सांस्कृतिक भवन पूर्ण करण्याकरिता पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.नगर परिषद, जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचीही उदासीनताच४नगर परिषद प्रशासनाने कलावंतांच्या मागणीवरून सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीचे काम हाती घेतले. स्लॅबपर्यंतचे कामही पूर्ण झाले; पण माशी कुठे शिंकली, कुणास ठाऊक, लाखो रुपयांचा खर्च केल्यानंतर बांधकाम अर्धवट सोडण्यात आले. या बाबीस कित्येक वर्षांचा कालावधी लोटला असताना ते बांधकाम पूर्ण करण्याकरिता कुणीही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींही याबाबत उदासिन असल्याचेच दिसते. यामुळे जिल्ह्यात सांस्कृतिक भवन होणार, हे कलावंतांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचेच दिसते. संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर भवन पूर्ण करणे गरजेचे आहे.
सांस्कृतिक भवन बांधकामाचा तिढा कायम
By admin | Updated: June 18, 2015 01:49 IST