थारच्या दलित वस्ती कामाचा आगळावेगळा उपक्रमआष्टी (शहीद) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी थार ग्रामपंचायतला चार लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. दरवेळी निविदा झाल्यावर कामांना विलंब होतो म्हणून यावेळी आधी उत्कृष्ट काम करूनच निविदा तयार करण्याचा निर्णय ग्रामस्थांसह ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी घेतला. लागलीच त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये १७ मीटर काम जादा करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाची दखल पंचायत समिती प्रशासनाने घेवून ग्रा.पं.चे कौतुक केले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थार गावात तीव्र पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा प्रश्न होता. सरपंच वनिता केवटे, उपसरपंच दिलीप सागडे, माजी सरपंच राजू निस्वादे, ग्रा.पं. सदस्य अरूण घोडीले यांनी दलित वस्ती कामासाठी लागणारे पाणी टँकरद्वारे आष्टीवरून आणण्याचा निर्णय घेतला. ई-निविदा झाल्यावर काम चांगले होणार नाही, यामध्ये बिलो दराने निविदा जाईल, अशी चर्चा झाली. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी स्वत: काम करून घेण्यास सरसावले. एका कंत्राटदाराला उधारीमध्ये साहित्य व पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. संबंधित कंत्राटदाराने क्षणाचाही विलंब न लावता गिट्टी, सिमेंट, रेती, पाणी टँकर उपलब्ध करून दिला. लागलीच कामाला सुरूवात झाली.इस्टीमेटमध्ये लोखंड टाकण्याची तरतुद होती. मात्र अंतर्गत रस्ता असल्याने लोखंड टाकण्याची गरज नाही, असे सरपंच वनिता केवटे यांनी ठरविले. सर्व सदस्यांनी होकार दिला. त्या पैशात १७ मीटर काम ईस्टीमेटच्या तरतुदीपेक्षा जास्त करण्यात आले.अवघ्या आठ दिवसात सर्व काम झाले आहे. २१ दिवस पाणी मारण्यात आले. सदर कामाची पाहणी समाजकल्याण सभापती वसंतराव पाचोडे, गटविकास अधिकारी माणिक चव्हाण, शाखा अभियंता के.एच. बिंझाडे यांनी करीत काम पाहून समाधान व्यक्त केले. पंचायत समिती सभापती अर्चना रहाटे यांनी सरपंच वनिता केवटे, ग्रामसेवक रमेश सावरकर यांचे कौतुक केले.शासनाने ई-निविदा करण्याची अट घालून दिली असल्याने आता गावकऱ्यांच्या पुढाकाराने काम पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करूनच बील काढल्या जाणार असल्याची माहिती सरपंच वनिता केवटे यांनी दिली.(प्रतिनिधी)
गावकऱ्यांच्या सहकार्यातून सिमेंट रस्ता बांधकाम
By admin | Updated: June 3, 2016 02:14 IST