लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि विविध रोगांच्या आक्रमणा पिकांचे जिल्ह्यात दरवर्षी मोठे नुकसान होते. पीक नुकसानीच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे, पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत आतापावेतो जिल्ह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पीक विमा भरला. मात्र पीक विमा भरूनही बहुतांशवेळी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाते. यात शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा खरीप हंगामात अतिपाऊस आणि विविध रोगांच्या आक्रमणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनचे पीक पिवळे पडले तर कपाशीचीही बोंडे सडली. ७२ तासांत नुकसान झालेल्या ३७३ शेतकर्यांनी कृषी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या.
पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यातखरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना पीक नुकसानीपोटी मिळणार्या आर्थिक मदतीकरिता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
१,१५००० हेक्टरवरील पिकांचे झालेत पंचनामेखरीप हंगामात अतिपाऊस, विविध रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेकांना सोयाबीनचा एकरी एक ते दोन पोती उतारा आला. तर कपाशी पिकाचीही अशीच अवस्था झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे केले. १ लाख १५ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून कपाशीचे पंचनामे सुरू आहेत.
पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. जिलह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पिकांचा विमा उतरविला असून ४ कोटी ९२ लाख ६९ हजार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पीक विमा उतरवूनही लाभ मिळाला नसल्यास शेतकर्यांनी तक्रार करावी. उपाययाेजना केल्या जाईल. -विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.