चौकशी सुरू : शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकआकोली : शेतकऱ्यांकडून पाणी पट्टी कर वसून करून सिंचनाकरिता गेट क्र. ३ मधून पाणी न सोडल्याने पिके सुकली. यात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. नगदी स्वरुपात कर वसूल करूनही साखर कारखान्याकडे गेलेल्या ऊसातूनही कराची रक्कम कपात केली. एकाच करासाठी दोनदा रक्कम वसूल केल्याचे शेतकऱ्यांनी खरांगणा (मो.) पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. आंजी-बोरखेडी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करणे व पाणी कर वसूल करण्याची जबाबदारी पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढोकणे यांच्याकडे होते. संस्थाध्यक्ष हे मनमानी पद्धतीने पाण्याचे वाटप करतात, अशी ओरड होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. गेट क्र. ३ वर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी माझ्या विरूद्ध तक्रारी केल्या, असा समज करून घेत अध्यक्षाने जाणीवपूर्वक सदर गेट बंद ठेवले. पाणी कराची रक्कम भरूनही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पाणी दिले नाही. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. कराचे पैसे घेऊनही पाणी न देणे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. एकाच करासाठी शेतकऱ्यांकडून दोन वेळा कर वसूल करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली, हे उघड आहे. नगदी कर भरूनही साखर कारखान्याच्या थकबाबीदार यादीत शेतकऱ्यांची नावे पाठवून दोन वेळा कर वसूल केला. यानंतरही सिंचनासाठी पाणी सोडले नाही. चार वर्षांपासून कर भरूनही पावत्या दिल्या नाही. कराची रक्कम स्वत: वापरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी ठाणेदारांची भेट घेत तक्रार दिली. यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)