लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात प्रथम शतप्रतिशत लसीकरण करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना पाच लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा खुद्द पालकमंत्र्यांनी केली आहे. पण, लसीकरणाचा वेग वाढायला लागताच लससाठा संपत असल्याचा अनुभव वर्धेकरांना येत आहे. आताही लससाठा संपल्याने केंद्रांना टाळे लागले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लसीकरणाचे लक्ष्य कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीकरणाची गती वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यासोबतच पारितोषिक योजनाही अंमलात आणली आहे. ग्रामपंचायतीही पुढाकार घेऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसल्याने जिल्ह्यात १८० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासोबतच गावागावांमध्ये शिबिरे घेऊन लसीकरण केले जात आहे. परंतु शासनाकडून लस पुरवठा होत नसल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आत. १८ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढायला लागली. सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे जवळपास ४७ केंद्रांवरून लसीकरण सुरू होते. लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून जिल्ह्याला लसींचा पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी संख्येचा विचार करून लससाठ्याची मागणी करण्यात आली आहे. अद्यापही लस उपलब्ध न झाल्याने गुरुवारी केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लस उपलब्ध न झाल्यास शुक्रवारपासून ही केंद्रेही बंद करावी लागतील.- डॉ. प्रभाकर नाईक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी