समुद्रपूर : नैसर्गिक विधीकरिता गेलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या युवकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. ही घटना डोंगरगाव येथे शनिवारी रात्री घडली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. विलास लोहकरे रा. डोंगरगाव असे जखमीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सुत्रांनुसार, डोंगरगाव येथील एक अल्पवयीन मुलगी नैसर्गीक विधी करण्याकरिता गेली होती. यावेळी विलासने तिचा पाठलाग केला. तिचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने सुटका करून घेत घराच्या दिशेने पळ काढला. झालेला प्रसंग तीने कुटुंबियांना सांगितला. कुटुंयिांनी घटना कळताच समुद्रपूर पोलीस ठाणे गाठत प्रकरणाची तक्रार केली. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी विलासच्या घरी जावून त्याला चांगलाच चोप दिला. गावकऱ्यांच्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने त्याला समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; येथे त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठविले. (तालुका प्रतिनिधी)
विनयभंग करणाऱ्याला ग्रामस्थांचा चोप
By admin | Updated: February 1, 2015 23:01 IST