रामदास तडस यांची माहिती : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्र्यांची तत्वत: मान्यतावर्धा : केंद्र शासनाच्या धोरणानुसार महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला बळ देण्याकरिता केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे सखी केंद्र स्थापन करण्याची लोकप्रिय योजना आखण्यात आली. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पहिलेच सखी केंद्र वर्धा लोकसभा मतदार संघातील देवळी येथे उभारण्याकरिता केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी तत्वत: मान्यता प्रदान केली असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.विशेष करून महिलांच्या मदतीकरिता आखण्यात आलेल्या योजनेद्वारे या केंद्राची निर्मिती होत आहे. महिलांना तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीकोणातून सर्व प्रकारची सुविधा सखी केंद्रामध्ये नियोजित करण्यात आली आहे. नगर परिषदेसह मोठी लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी महिलाकरिता मदत केंद्र, वैद्यकीय सहायता, पोलीस मदत केंद्र, सामाजिक न्याय केंद्र, कायदेविषयक सहायता, तात्पुरता निवारा तसेच व्हिडीयो कॉन्फरन्सींग इत्यादी अनेक सुविधांनी हे केंद्र सज्ज राहणार असल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे.वर्धेत दिली होती मेनका गांधींनी माहिती वर्धा : मेनका गांधी वर्धा जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना त्यांनी स्वत: योजनेची माहिती महिला मेळाव्यातून महिलांना व उपस्थित जनसमुदायाला दिली होती. सखी केंद्र स्थापन करण्याकरिता खा. रामदास तडस यांनी दिल्ली येथे वेळोवेळी महिला बालकल्याण विभागात पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. २४ एप्रिल २०१७ रोजी दिल्ली येथे ना. मेनका गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेवून सखी केंद्राचा विषय नमूद केला. त्याला त्यांनी सकारात्क प्रतिसाद देवून देवळी येथे सखी केंद्राला तत्त्वत: मान्यता प्रदान करून प्रशासकीय कार्यवाहीकरिता विभागाच्या सचिवांना आदेशीत केल्याची माहिती खा. तडस यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)
केंद्राचे राज्यातील पहिले सखी केंद्र देवळीत
By admin | Updated: May 2, 2017 00:15 IST