प्रायोजकत्वावरील कॅमेरे : दुरूस्तीचे प्रयोजन नाहीवर्धा : रस्त्यावर घडत असलेल्या घटना वा गुन्हेगारीची तत्काळ माहिती मिळावी याकरिता शहरातील आर्वी नाका व बजाज चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. पण सध्या त्यांनी डोळे मिटले आहे. प्रायोजकत्त्वावरील या कॅमेऱ्याच्या दुरूस्तीचे प्रयोजन नसल्याने पोलिसांची अडचण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाकरिता नव्याने ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यातून त्याची दुरूस्ती करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती आहे. वर्धा शहरात मंगळसूत्र चोरट्यांनी चांगलाच उधम माजविला होता. त्यांना पकडणे पोलिसांकरिता आव्हान ठरत होते. शिवाय रस्त्यावर होत असलेल्या अनेक घटनांची पोलिसांना विलंबाने माहिती मिळत होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रायोजकत्त्वावर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखली. यात मोठा चौक म्हणून बजाज चौक व आर्वी नाका परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या भागातील हे कॅमेरे काही काळ सुरळीत सुरू होते. कालांतराने यातील काही कॅमेरे बंद पडले. त्याच्या दुरूस्तीकरिता कुठलेही अनुदान नसल्याने पोलीस विभाग अडचणीत आहे. लावण्यात आलेले सर्वच कॅमेरे बंद पडल्याने ते कुचकामी ठरत आहे. या कॅमेऱ्यात नेमका कोणता बिघाड झाला याची माहिती पोलीस विभागाकडे नाही. काही ठिकाणी केबल खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे तर कुठे कॅमेरेच खराब झाल्याचे बोलले जात आहे. नवे कॅमेरे लावण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)
सीसीटीव्हीचे डोळे बंद
By admin | Updated: January 6, 2016 02:45 IST