ंआष्टी(श.): एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे नेहमी म्हटल्या जाते. मात्र वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे परिवहन मंडळाच्या तिजोरीवर याचा बोजा पडत आहे. नागपूर विभागात मार्च अखेर तब्बल ९६ अपघातांची नोंद झाली असून एसटी महामंडळाला नुकसान भरपाईपोटी १ कोटी ३४ लाख १७ हजार ९५५ रुपये एवढी रक्कम मदत म्हणुन द्यावी लागली आहे. परिवहन मंडळाच्या बसमुळे होणारे अपघात १ टक्क्याच्या आंतच असतात. परंतु असे असले तरी एसटी महामंडळ तोट्यात असल्याने नेहमीच बोलल्या जाते. उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच महामंडळाने प्रवासी अभियान राबवून आपल्या उत्पन्नात बर्यापैकी भर घातली. परंतु मागील वर्षभराचा आढावा घेतल्यास परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ या कालावधीत एकूण ९६ अपघातांची नोंद करण्यात आली. यातील १६ अपघात प्राणांतिक, ५१ गंभीर स्वरुपाचे आणि २९ अपघात किरकोळ स्वरुपाचे होते. परिवहन मंडळाच्या नागपूर विभागात एकूण ११00 चालक आहेत. अपघात झाल्यानंतर मयत इसमाचे वारसदार, नातेवाईक एसटी महामंडळाकडून मिळालेल्या रकमेतून समाधान न झाल्यास न्यायालयात धाव घेतात. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार परिवहन महामंडळाला नुकसान भरपाई द्यावी लागते. मागील वर्षात राज्य परिवहन महामंडळाला नुकसान भरपाईपोटी १ कोटी ३४ लाख १७ हजार ९५५ रुपये चुकविण्याची वेळ आली. एवढय़ा मोठय़ा रकमेचे नुकसान दरवर्षी होत असल्यामुळे महामंडळाचे प्रशासन खळबडून जागे झाले आहे. अपघाताच्या रुपाने महामंडळाची खाली होत चाललेली तिजोरी कशी वाचवावी, या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळ गांभिर्याने विचार करीत असून याकरिता महामंडळाने अनेक स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र दिवसेंदिवस अपघाताच्या घटना पाहता तिजोरीवरील भार वाढतच असल्याने प्रशासनासमोर हा चिंतेचा विषय आहे.(प्रतिनिधी)
एसटीवर अपघाताचा १.३४ कोटीचा बोजा
By admin | Updated: May 15, 2014 23:52 IST