देवळी : तेराव्या वित्त आयोगातील सुवर्णपथक योजनेअंतर्गत चौकाचे व रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी स्थानिक बसस्थानक चौक ते दिनाशावली मस्जीद ट्रस्टपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. येथील नगरपरिषद प्रशासनाने ही मोहीम राबविली. जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या या कारवाईत यशवंत माध्यमिक कन्या शाळेच्या बाजूची ४० दुकाने हटविण्यात आली. या कारवाईमुळे दुकानमालकांनी संताप व्यक्त केला. शहरात मागील २० वर्षांपासून येथील हॉटेल, पानठेले, फर्निचर, किराणा, मोबाईल शॉप, हेअर सलुन, टेलर्स, सायकल दुरूस्ती, स्टेशनरी, आदी दुकाने थाटण्यात आली होती. अतिक्रमणातील बहुतेक दुकाने ही सुशिक्षित बेरोजगारांची आहे. यामुळे या दुकानदारांचा रोजगार या व्यवसायावरच विसंबून होता. त्यामुळे अनेकांचे भवितव्य अधांतरी ठेवून, बेरोजगारांवर कुऱ्हाड कोसळल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. पालिकेच्या खास सभेनुसार शासनाच्या सुवर्णपथक योजनेतील ८० लाख रुपयांच्या खर्चातून या परिसराचे सौंदर्यीकरण होणार आहे. यात रस्त्याच्या एका बाजूची नाली व प्लॅटफार्मचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ठाकरे चौक ते टिळक चौकापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. शासकीय निकषानुसार रस्ते बांधकामसाठी हा निधी प्राप्त होत नसल्यामुळे रस्त्यांचे सौंदर्यीकरण दाखवून निधी प्राप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. न.प. सदस्य ज्योती इंगोले यांच्या पतीच्या मालकीचे हॉटेल याच मार्गावर असून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत हे हॉटेल काढण्यात आले आहे. यावेळी पालिका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
४० दुकानांवर चालले बुलडोजर
By admin | Updated: December 9, 2014 22:55 IST