बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:00 AM2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:29+5:30

अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.

BSNL does not have paperwork for receipt | बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

बीएसएनएलकडे पावतीसाठी कागद नाही

Next
ठळक मुद्देवर्धा कार्यालयातील प्रकार : ग्राहकांना होतोय मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्राहकाने दूरध्वनी बिलाचा भरणा केल्यानंतरही भारत संचार निगमकडून ऑनलाईन पावती वेळीच दिली जात नसून कागद उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने या विभागाला उतरती कळा लागली की काय, अशी चर्चा ग्राहकांत आहे.
तक्रार करूनही दूरध्वनी सेवेतील बिघाड वेळीच दुरुस्त न करणे, इंटरनेट सुविधेत सातत्याने निर्माण होत असलेला तांत्रिक बिघाड, गती कमी असणे तर कधी-कधी सेवा पूर्णत: ठप्प असणे आदी कारणांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. याचाच परिणाम, बीएसएनएल खासगी कंपन्यांच्या तुलनेत सेवा देण्यात पिछाडली असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने घरोघरी दिसणारे टेलिफोन अडगळीत पडले.
अनेक घरांतून टेलिफोन हद्दपार झालेत. मात्र, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आजही दूरध्वनीचा वापर केला जात आहे. मात्र, देयक पुरविण्यात स्थानिक बीएसएनल प्रशासनाकडून कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. परिणामी, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केल्यानंतरही पावती दिली जात नाही. पाठपुरावा करताना ग्राहकांची दमछाक होते; मात्र, बीएसएनएलमधील गलेलठ्ठ पगाराच्या निगरगट्ट कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही.
मुद्रित पावती देण्याकरिता कागद, अ‍ॅडव्हान्स प्राप्त झालेला नाही, प्रिंटरमध्ये बिघाड आहे, अशी बेजबाबदार उत्तरे देऊन ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही अंकुश नाही. बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत धडे द्यावेत, देयकाचा भरणा केल्यानंतर तत्काळ पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता दूरसंचारचे जिल्हा व्यवस्थापक संजयकुमार इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेतो, असे म्हणून त्यांनी दूरध्वनी बंद केला.

दोन महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी वेतनाविना
बीएसएनएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन नाही. यामुळे अनेकांचे बँका, विम्याचे हप्ते थकले असून आर्थिक संकट ओढवले आहे. वेतन नियमित मिळाले असते तर कागद खरेदी करता आली असती. मात्र, मुख्य कार्यालयाकडूनच अ‍ॅडव्हान्स वेळीच प्राप्त होत नसल्याने ही समस्या उद्भल्याचेही विभागीय अभियंता विजय ढोरे यांनी सांगितले.

Web Title: BSNL does not have paperwork for receipt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.