लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लग्नसराईची धामधूम सर्वत्र सुरू झाली असून, आप्तस्वकियांच्या लग्नासाठी पाहुणे ठरलेल्या तारखेदिवशी मंगल कार्यालयांत दाखल होत असतात. लग्न सोहळ्यादरम्यानचे विधी आणि इतर सोपस्कार पार पाडण्यात गुंतलेल्या पाहुण्यांना हेरत त्यांच्याकडील ऐवज चोरणारे चोरटे या सोहळ्यात फिरत असतात. अलगद हेरत ऐवज लांबवणाऱ्या चोरट्यांमुळे लग्न सोहळ्याच्या आनंदावर पाणी फिरते. अशाचप्रकारे एका चोरट्याने एका लग्न सोहळ्यातून ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने लग्न सोहळ्यातील चोरट्यांचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हे करा...लग्नासाठी शक्यतो मोजकेच दागिने आणा. दागिन्यांची पर्स, बॅग शक्यतो घरातील माणसांकडेच द्या. फोटो सेशन करताना ऐवजावर लक्ष ठेवा. परक्या, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवा. पाकिंगमधील वाहनांमध्ये ऐवज ठेवणे टाळा.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेतशहर आणि परिसरात अनेक मंगल कार्यालये, लॉन्स तसेच हॉटेलच्या आवारात लग्न सोहळ्यांचे आयोजन होत आहे. याठिकाणी प्रत्येक ठिकाणचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असतात. हे बंद कॅमेरेच चोरांसाठी फायद्याचे ठरतात. यामुळे अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास त्याच्या तपासावेळी पोलिसांवर मर्यादा येतात. हे टाळण्यासाठी मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स चालकांनी आपल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत सुरू ठेवणे आवश्यक आहे.
लग्न सोहळ्यात चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपासपोलिस हवालदार अनिल भोवरे यांच्या मुलीचा विवाह एका सेलिब्रेशन हॉल, आलोडी येथे होता. दरम्यान, लग्नात आलेल्यांनी लिफाफ्यात भेट स्वरूपात रक्कम दिली होती. ते सर्व लिफाफे एका बॅगमध्ये ठेवलेले होते. मात्र, अज्ञात चोरट्याने लिफाफे ठेवून असलेली बॅगच चोरून नेली. त्यात सुमारे सव्वा लाख रुपयांची रक्कम होती. याप्रकरणी सेवाग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होते...लग्नासाठी अनेक पै-पाहुणे मंगल कार्यालयात दाखल होत असतात. प्रत्येकजण याठिकाणी आपल्या सुबत्तेचे दर्शन इतरांना घडविण्यासाठी सक्रिय असतो. सोबत आणलेले सोन्याचे दागिने व इतर ऐवज सोबतच्या पर्स, बॅगमध्ये ठेवत ते सर्वत्र फिरत असतात. नातेवाईक, पाहूणे, आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीदरम्यान अशा पर्स, बॅगा इतरत्र ठेवल्या जातात. अशा पर्स आणि बॅगा हेरत चोरटे त्या लंपास करतात.
१ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लग्नमंडपातून चोरी गेला.सेवाग्राम हद्दीतील एका सभागृहात लग्नसोहळा पार पडला. दरम्यान लग्न मंडपात चोरट्याने चोरी करत रोख रकमेचे लिफाफे असलेली बॅगच चोरुन नेली.
"लोकांनी मौल्यवान वस्तू लग्न सोहळ्यादरम्यान जपणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्ती व इतर संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपल्याकडील ऐवज व इतर मौल्यवान वस्तू शक्यतो इतरांकडे देणे टाळावे तसेच कार्यालयातील लॉकरचा वापर करावा. सध्या लग्न सोहळ्यात चोरीच्या घटना घडताना दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे."- संदीप कापडे, सहायक पोलिस निरीक्षक, सावंगी