बोर व्याघ्र प्रकल्पातील प्रकार : स्थानिकांना डावलून वनविभागाची ठेकेदाराच्या माध्यमातून कामे सेलू : स्थानिकांना रोजगार मिळावा असा शासनाचा हेतू आहे. याकरिता विविध योजनाा अंमलात येत आहे; मात्र येथील बोर व्याघ्र प्रकल्पात ठेकेदाराच्या माध्यमातून मध्य प्रदेशातून मजूर आणून गवत कटाईची कामे होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. येथे सर्व नियम धाब्यावर बसवून कामे होत असल्याने वनविभागामार्फत या कामात गौडबंगाल होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. शासकीय धोरणाला बगल देत येथील बोर व्याघ्र प्रकल्पात ही कामे होत आहेत. यात ठेकेदाराच्या माध्यमातून बाहरेचे १५० च्यावर मजूर आणून काम करण्यात येत आहे. कमीशनच्या लालसेपाटी हा सगळा भोंगळ कारभार सुरू असून वरिष्ठांकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. येथे ज्या जंगलात वास्तव्याची इतर कुणालाही परवानगी नाही, अशा जंगलात मध्य प्रदेशातून आणलेल्या मजुरांना आरक्षित जंगलातच झोपड्या उभारुन अधिकाऱ्यांच्या मर्जीने वास्तव्य सुरू आहे. त्यांच्यासोबत लहान मुलेही तिथे वास्तव्यास आहेत. जंगलात तिथे विस्तव पेटविण्याची परवानगी नसताना हे मजूर तिथेच स्वयंपाक करीत होते. यातून मजुरासह चिमुकल्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर उघड्यावरील चुलीमुळे जंगलाची सुरक्षा येथे धोक्यात आली आहे. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असताना केवळ कमिशनच्या लालसेपोटी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. वेठबिगारासारखे या मजुरांना येथे जंगलात ठेवून त्यांच्याकडून ही कामे करून घेतल्या जात असून त्यांना अल्पमजुरी देऊन ही कामे केली जात असल्याची माहिती आहे.(शहर प्रतिनिधी)वनअधिकाऱ्यांकडून शासकीय नियमांना बगल ?मनरेगाच्या माध्यमातून गवत कापणीचे कामे केल्या जाते. स्थानिकांना रोजगार मिळावा या शासनाच्या उद्देशाला मात्र येथे हरताळ फासला आहे. यापूर्वीही येथे या जंगलात मजुरांमार्फत काही कामे करायची असताना तिथे चक्क जेसीबी मशीन लावून कामे केल्याचे उघडकीस आले होते. जंगलाचा भाग हा रिझर्व्ह झोन मध्ये येत असल्याने येथे इतर कुणाला विनापरवानगी जाण्याची अनुमती नाही. याचाच फायदा हे अधिकारी घेत असल्याची चर्चा आहे. कागदोपत्री मजुरांमार्फत कामे केल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार होत आहे.
मध्य प्रदेशातून मजूर आणत केली गवताची कापणी
By admin | Updated: August 31, 2015 01:52 IST