रितेश वालदे ल्ल बोरधरणकुटुंबाचा उदरनिर्वाह व अपंगत्वाचा भार सोसत एक तरूण धडपड करीत आहे. वाशिम जिल्ह्यातील हा तरूण गावोगावी भटकंती करीत भजने व भक्तीगीते सादर करतो. यात ग्रामस्थांचे मनोरंजन करीत जिल्ह्यातील हा अंध तरूण कुटुंबाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करीत आहे.काजळी शिवर ता. कारंजा (लाड), जि. वाशिम येथील जन्मत:च अंध असलेला २० वर्षांचा तरूण तालुक्यातील गावात जाऊन भजने, कव्वाली तसेच भक्तीगीते सादर करीत नागरिकांचे मनोरंजन करीत फिरत आहे. यावरच त्याचे व त्याच्या कुटुंबाचे गुजराण होत असल्याचे तो सांगतो. जन्मापासूनच अंधत्व आलेला योगेश बनेश कोडापे याला वडील, चार भाऊ व एक बहीण आहे. योगेश हा घरातील मोठा मुलगा असून त्याचे वडीलही पायाने अपंग आहेत. घरी अठराविश्वे दारिद्र्य असून पोटासाठी त्याच्यावर कुटुंब घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. शासनाच्या निराधार योजनेचा लाभही या युवकाला मिळालेला नाही. त्याच्याकडे शासकीय रुग्णालयातील १०० टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असल्याचे तो सांगतो; पण शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्याची खंतही तो व्यक्त करतो. गावात जाणे, तेथील लोकांसमोर बसून दोन्ही हाताने डफरी वाजवून गीत सादर करून त्यांचे मनोरंजन करणे एवढेच काम तो करतो. यात त्याला लहान भाऊ मदत करतो. योगेश हा उत्तम सुरात गाणे म्हणतो. त्याच्या परिस्थितीची माहिती देतो. लोकांच्या आवडीनुसार गाणे, भजने, कव्वाली सादर करतो. यातून त्याला दिवसभरात ६०-७० रुपये मिळतात. यातूनच त्याची व त्याच्या परिवाराची दोन वेळच्या जेवणाची सोय होत असल्याचे तो सांगतो. सध्या तो व त्याच्या परिवार सेलू येथे वास्तव्यास आहे. दररोज दुसऱ्या गावात जायचे व तेथून मिळालेल्या रकमेतून कुटुंबाचा गाडा हाकायचा, एवढाच त्याचा दिनक्रम आहे. दररोज सकाळी निघायचे. चौक दिसेल तेथे खाली बसायचे, हाती डफरी घेत गाणे गायचे, एवढेच काम माझ्या प्रारब्धी असल्याचे तो भाऊक होऊन सांगतो. दररोज आपल्या अंध भावाचा हात धरून तो चिमुकला पायदळ गावोगावी फिरतो. शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने माझ्यावर ही वेळ आल्याचेही तो सांगतो. गावातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची याचनाही तो करतो. या कुटुंबाला जगण्याचे बळ मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समोर येऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे.शासकीय योजनांपासूनही कुटुंब वंचितच४मूळचे वाशिम जिल्ह्यातील काजळी शिवर या गावातील कोडापे कुटुंब अपंगत्व आणि दारिद्र्यामुळे हतबल झाले आहे. गावोगावी भटकंती करीत भजन, भक्तीगीत सादर करून मनोरंजन करणे व उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या प्रारब्धी आले आहे. योगेश जन्मत: आंधळा, वडील अपंग आणि भावंडे असे हे कुटुंब ठेचाळत असताना त्यांना अद्याप एकाही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. अपंगांकरिता ढीगभर योजना आहेत; पण योगेशला कुणाचाही आधार मिळाला नाही. यामुळे अखेर कुटुंबासाठी त्याला गावोगावी भटकावे लागतेय.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अंध तरूणाची धडपड
By admin | Updated: December 15, 2015 04:20 IST