नगर परिषदेची पोटनिवडणूक : राकाँचे एका जागेवर समाधान, अपात्रपैकी चार विजयीहिंगणघाट : नगर परिषदेच्या पोटनिडणुकीत भाजपाने चार जागा काबीज केल्या, तर राकाँ व अपक्षाला प्रत्येकी एकाच जागेवर समाधान मानावे लागले. ४ प्रभागातील सहा जागांसाठी रविवारी ४९.४४ टक्के मतदान झाले होते. त्याची सोमवारी मोजणी झाली. समुद्रपूर नगर पंचायतीनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या या यशामागे आ. समीर कुणावार यांची राजकीय खेळी महत्त्वाची मानली जात आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने येथील नगरपरिषदेच्या सहा उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. हे सहाही उमेदवार राकाँचे होते. या पोटनिवडणुकीत राकाँला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. शिवाय अपात्र ठरलेल्या सहापैकी चार उमेदवारांनी भाजपाकडून तर एका उमेदवाराने अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या पैकी निता सतीश धोबे, शुभांगी सुनील डोंगरे यांनी आपली जागा कायम ठेवली तर सूूर्यकांता मडावी यांच्या सुनबाई मेघा मडावी भाजपाच्या चिन्हावर विजयी झाल्या. तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले प्रलय तेलंग यांनीही विजय संपादीत केला. प्रभाग क्र. ७ मध्ये माजी आमदार राजू तिमांडे यांचे पुत्र सौरभ तिमांडे यांनी बाजी मारली. प्रभाग क्र. ६ मध्ये भाजपाचे मनीष देवढे विजयी झाले. सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग ७ मध्ये सौरभ राजू तिमांडे यांनी माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार यांचा १५१ मतांनी पराभव केला. सौरभ तिमांडे यांना १,८७७ मते मिळाली तर सुरेश मुंजेवार यांनी १,७२६ मते प्राप्त केली. माजी आमदार राजू तिमांडे यांच्या पुत्राने उमेदवारी दाखल केल्याने ही जागा प्रतिष्ठेची होती. येथे भाजपाचे अॅड. स्वप्नील धारकर यांना ५६२ मते मिळाली. शिवसेनेचे संजय जैन यांना ९०३, काँग्रेसचे राजेश हिंगमिरे यांना २३१, अपक्ष उमेश वकील यांना २११, सचिन वाघे यांना १३८, श्याम इडपवार यांना १०२ मते मिळाली. या प्रभागात ४६ मतदारांनी नोटाचा उपयोग केला. प्रभाग क्र. २ मध्ये भाजपाच्या निता सतीश धोबे यांनी २,१४० मते मिळवून अपक्ष उमेदवार ज्योती मनोज वरघने यांचा २२ मतांनी पराभव केला. ज्योती वरघने यांना २,११८ मते मिळाली. येथे राकॉच्या शितल दिनेश देशकरी यांना १,२८१, अपक्ष वैशाली धिरज भगत यांना ४०७, सारिका लिलाधर कानबाळे १७० मते मिळाली. येथे १०३ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. याच प्रभागातील भाजपाच्या मेघा नितीन मडावी यांनी १,९६७ मते मिळवून अपक्ष उमेदवार सुरेखा शंकर मडावी यांचा केवळ एक मताचे फरकाने पराभव केला. सुरेखा मडावी यांना १,९६६ मते मिळाली. विजयी मेघा मडावी या अपात्र नगरसेविका सुर्यकांता मडावी यांच्या सुनबाई आहेत. राकाँच्या शोभा उद्धव सराटे यांना १,२८५, बसपाच्या छाया रामदास मडावी यांना ८५९ मते मिळाली. १४२ मतदारांनी नकारात्मक मतदान केले.आश्वासनापूर्तीचा निकाल- समीर कुणावारनिवडणुकीच्या पूर्वीपासूनच विकासकामांबाबत जनतेला आश्वासक शब्दात अभिवचन दिले होते. त्यातील बहुसंख्य आश्वासनांची पूर्तता झाल्याने जनतेने भाजपावर विश्वास टाकला. या निकालाने आमच्यावरील जबाबदारी वाढलेली आहे. भविष्यात जनतेच्या प्रमुख समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे मत आ. कुणावार यांनी व्यक्त केले. चुकांची दुरूस्ती करू - सुधीर कोठारीआमच्या हातून निश्चितपणे काही चूका झाल्या. येत्या आठ महिन्याच्या काळात त्या दुरूस्त करून न.प.वर पुन्हा झेंडा फडकवू असे मत राकाँचे नेते व नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी यांनी व्यक्त केली. अल्पमताच्या पराभवाची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्य शासन भाजपाच्या ताब्यात असल्याचा फायदा त्यांना मिळाल्याचे ते म्हणाले. ५०० मतदारांची नोटाला पसंती हिंगणघाट येथील निवडणुकीत एकूण ५०० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. केवळ एका मताच्या फरकाने विजय मिळालेल्या प्रभाग क्र. २ मधील अनुसूचित जमाती गटात सर्वाधिक १४२ मतदारांनी नकारात्मक मतदान केले. वर्धेत अपक्षाची बाजी वर्धा येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये एका जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. येथे अपक्ष उमेदवार अनिल रामप्यारे यादव यांनी बाजी मारली. त्यांनी १ हजार १९० मते घेत या निवडणुकीत विजय संपादीत केला. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपाच्या उमा खोब्रागडे ८८० मते व काँग्रेसचे महोमद सलीम अब्दुल सत्तार कुरेशी हे ६७३ मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.वर्धा नगर परिषदेच्या या प्रभागातील नगरसेवकाने स्वत:च्या नावे पालिकेत व्यवसाय केल्याच्या कारणाने त्याला अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्या एका जागेकरिता ही निवडणूक होती. या एका जागेकरिता एकूण सात उमेदवार उभे होते. या जागेकरिता रविवारी दोन केंद्रावरून मतदान झाले. येथे ४४ टक्के मतदान झाले होते. त्याची मोजणी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील क्रीडा संकुलाच्या सभागृहात करण्यात आली. यात अनिल यादव विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. येथे झालेल्या एकूण मतदानापैकी ३ हजार ५४८ मते वैध ठरली तर २५ मते अवैध ठरल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.
हिंगणघाटात सहापैकी चार जागांवर भाजप
By admin | Updated: January 12, 2016 01:47 IST