लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेट बँकिंगद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या आरोपीला हुडकून काढत त्यास अटक करण्यात वर्धा पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे.हर्षत पशुपती सिंग (२७) रा. खगडिया राज्य बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.वायगाव येथील बंडू हुडे यांना खोटी बतावणी करून नेट बँकिंगच्या माध्यमातून १४ लाख १७ हजार ९६४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सावंगी (मेघे) येथील वर्षा कंडमबेथ यांना क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याची बतावणी करून १ लाख ६७ हजारांनी गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास वर्धा सायबर सेलकडे आला असता सायबर सेलच्या चमूने आरोपीबाबतची तांत्रिक माहिती गोळा केली. त्यानंतर आरोपी बिहार राज्यातील असल्याचे पुढे येताच सायबर सेलची चमू बिहार येथे रवाना झाली. देवळी ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षत पशुपती सिंग (२७) रा. खगडिया यास बिहार राज्यातील खगडिया येथून अटक करण्यात आली. तर सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी अशोक कुमार पुना रविदास रा. कोचरा, जिल्हा नालंदा, बिहार याला हुलासगंज, जि. जहानाबाद येथून ताब्यात घेतले. परंतु, या आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्यास सीआरपीसी कलम ४१ (१)(ब) प्रमाणे सूचनापत्र देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशावरून पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सौरभ घरडे, नीलेश कट्टोजवार, अनुप कावळे, अंकित जीभे, अमरदीप वाढवे, आकाश कसर, प्रकाश खरडे आदींनी केली.