लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण अद्याप सापडला नसला तरी १४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या नवीन कोविडबाधितांमध्ये पुलगाव येथील चार, तर वर्धा येथील सात व्यक्तींचा समावेश असल्याने वर्धा आणि पुलगाव सध्या कोविडचे हॉटस्पॉटच ठरू पाहत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी असलेले स्थानिक प्रशासन सुस्तच असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
६३६ व्यक्तींची टेस्ट- मागील २४ तासांत जिल्ह्यात ६३६ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता त्यापैकी १४ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नवीन कोविडबाधितांत आष्टी, कारंजा व हिंगणघाट येथील प्रत्येक एक, तर वर्धा येथील सात आणि पुलगाव येथील चार रुग्णांचा समावेश आहे.
नव्या रुग्णांत सर्वाधिक पुरुषबुधवारी जिल्ह्यात १४ नवीन कोविडबाधित सापडल्याने जिल्ह्यातील काेविडबाधितांची संख्या ४९ हजार ४६५ झाली आहे. या नवीन कोविडबाधितांत ११ पुरुष, तर ४ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
ॲक्टिव्ह कोविडबाधितांची संख्या झाली २२बुधवारी १४ नवीन कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविडबाधितांची संख्या २२ झाली आहे. या सर्व रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार केले जात आहेत.
मागील २४ तासांत जिल्ह्यात ६३६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिवाय कोविडची लस ही कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असल्याने नागरिकांनी लस घेऊन स्वत:सह स्वत:च्या कुटुंबीयांना सुरक्षित करावे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.