वर्धा : पावसाळा सुरू झाला की, साथींच्या रोगाचा धोका वाढतो. यातील एक गंभीर आजार म्हणजे लप्टोस्पायरोसीस. उंदीर, डुक्कर, गाय, म्हैस, घोडा, कुत्रा व मांजर आदी प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी किंवा मातींचा माणसाच्या त्वचेशी संपर्क आल्यास किंवा जखमा असल्यास या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
यामुळे होतो लेप्टोचा संसर्गलेप्टोस्पायरोसिस हा 'लेप्टोस्पायस' नावाच्या बॅक्टेरियामुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. हा बॅक्टेरिया दूषित पाणी, मातीमध्ये आढळतो. जिथे रोगग्रस्त प्राण्यांची लघवी मिसळलेली असते. मानवी शरीरात हा त्वचेतील जखमा, डोळे, नाक किंवा तोंडात दूषित पाणी गेल्यास, दूषित पाणी पिल्यास किंवा रोगग्रस्त प्राण्यांशी थेट संपर्कात आल्यास हा आजार होण्याचा धोका असतो.
ही आहेत प्राथमिक लक्षणेतीव्र ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये तीव्र वेदना, थकवा, थंडी वाजणे, डोळे लाल होणे (कन्जंक्टिव्हायटिस), अशक्तपणा, ओटीपोटात दुखणे, जुलाब किंवा उलटी, अंगावर रॅश, काही गंभीर प्रकरणांमध्ये हा आजार फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम करू शकतो. प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो.
घर-परिसर उंदीर आणि घुशीमुक्त ठेवाउंदीर आणि घुशी हे लेप्टोस्पायरोसिसचे मुख्य वाहक आहेत. कारण त्यांच्या मुत्रातून हा बॅक्टेरिया पसरतो. त्यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. तरच हा रोग पसरण्याची शक्यता कमी असते.
अशी घ्यावी काळजीलेप्टोस्पायरोसिसपासून वाचण्यासाठी साचलेल्या पाण्यातून चालताना किंवा शेतात काम करताना पूर्ण उंचीचे बूट आणि हातमोजे वापरावे. त्वचेवर कोणत्याही जखमा असल्यास ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि जंतुनाशक लावून झाका. दूषित पाण्याच्या संपर्कात येऊ नये. पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी वापरा. घराभोवती पाणी साचू देऊ नका. परिसरातील गटारे स्वच्छ ठेवा आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
"लेप्टोस्पायरोसिस हा गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार सुरू केल्यास बरा होऊ शकतो. पावसाळ्यात विशेषतः ग्रामीण भागात आणि ज्यांचा संपर्क प्राण्यांशी जास्त येतो, अशांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवा."- डॉ. सतीश हरणे, वर्धा.