लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत निव्वळ शेती हाच उत्पन्नाचा स्रोत असलेल्या शेतकरी, शेतमजूर पाल्यांना अनुदान तत्त्वावर लॅपटॉप वितरित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले आहे.
२०११-१२ पासून २०२२-२३ या वर्षापावेतो समितीमार्फत ८४३ विद्यार्थ्यांना अनुदान तत्त्वावर लॅपटॉप वितरित करण्यात आले आहेत. यावर्षी समितीमार्फत शीतगृह उभारणीबाबत घेतलेल्या निर्णयानुसार त्यावर होणारा खर्च लक्षात घेता अनुदान तत्त्वावर लॅपटॉप योजना कार्यान्वित करावी किंवा नाही, यावर चर्चा करण्यात आली. शिक्षणाकरिता वाढलेला खर्च व शेतकऱ्यांची सद्यस्थिती लक्षात घेता लॅपटॉप योजना कार्यान्वित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. लॅपटॉप मागणी अर्ज समितीचे मुख्य कार्यालय कापूस मार्केट यार्ड येथे १ डिसेंबरपासून निःशुल्क उपलब्ध आहे. अधिक माहितीकरिता समितीचे कर्मचारी आशिष चतुर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्र अर्जधारकाला लॅपटॉप वितरणाच्या अनुषंगाने ५० टक्के स्वनिधी रक्कम जमा करावी लागेल. लॅपटॉप खरेदीच्या दृष्टीने निविदा प्रकिया पूर्ण केल्यानंतरच लाभार्थ्याला स्वनिधी रक्कम किती भरणा करावयाची आहे, याबाबत कळविण्यात येणर अटे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला सभापती अॅड. सुधिर कोठारी यांच्यासह समितीचे उपसभापती हरीष वडतकर, संचालक मधुकरराव डंभारे, मधुसुदन हरणे, ओमप्रकाश डालिया, उत्तमराव भोयर, अशोक उपासे, राजेश मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, प्रफुल्ल बाडे, घनश्याम येरलेकर, पंकज कोचर, ज्ञानेश्वर लोणारे, शुभ्रबुध्दकांबळे, माधुरी चंदनखेडे, नंदा चांभारे, हर्षद महाजन, संजय कात्रे, सचिव टी. सी. चांभारे आदी उपस्थित होते. समितीच्या या उप्रकमाचे शेतकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.