खड्ड्यांमध्ये काड्या : जिवंत रोपांची संख्या नगण्यप्रशांत हेलोंडे। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत मागील काही वर्षांपासून शासन वृक्षारोपणावर भर देत आहे. मागील वर्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पदाधिकारी यांना उद्दीष्ट देत वृक्षारोपण करण्यात आले. आज एक वर्षाने या रोपांचे सर्वेक्षण करण्यात आले; पण हा सर्व्हे केवळ फेक असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. प्रत्यक्षात नगण्य झाडे जिवंत असताना ९६ टक्के वृक्ष जगल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षी शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातही १० लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. याबाबत नियोजन करून प्रत्येक विभागाला रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. वन व सामाजिक वनिकरण विभागासह काही सेवाभावी संस्थांनी आपली जबाबदारी नेटाने पार पाडली. वन व वनिकरण तसेच सेवाभावी संस्थांची रोपे जगली; पण अन्य सरकारी कार्यालयांकडून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचे तीनतेराच झाले आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या रोपट्यांचीही धुळधाण झाली आहे. झाडांसाठी खोदलेले खड्डे आहेत; पण त्यातील रोपे बेपत्ता आहे. काही आहे ती कोमेजली आहे. असाच प्रकार जिल्ह्यात अन्य ठिकाणीही पाहावयास मिळतो. मागील वर्षी महसूल विभागाने १६६५ रोपांची लागवड केली तर त्यातील १५५० झाडे जगल्याची अहवालात नोंद आहे; पण प्रत्यक्षात जिल्हाधिकारी, तहसील, उपविभागीय अधिकारी व अन्य कार्यालय परिसरात लावलेली रोपेही दिसत नाहीत. सर्वाधिक ४ लाख ९९ हजार २ रोपांची लागवड वन विभागाने केली. यातील ४ लाख ९६ हजार ३५० रोप जगल्याचे नमूद आहे. सामाजिक वनिकरणने २० हजार रोपे लावली व १९ हजार ७२० रोपे जगल्याची नोंद आहे. जिल्हा परिषदेची २ लाख १४ हजार ९१६ पैकी १ लाख ९७ हजार ३३३ तर कृषी विभागाची २१ हजार ९२४ पैकी १६ हजार ५२० झाडे जगल्याची नोंद आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ७ लाख ६४ हजार २१७ वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. यापैकी अहवालानुसार ७ लाख ३५ हजार ९०३ रोपे जगल्याचे सांगण्यात आले आहे. याची टक्केवारी ९६.३० असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, हजारो झाडे लावण्यातच आली नाही. शाळा, महाविद्यालयांच्या वृक्षारोपण मोहिमेचा फज्जाच उडाला असून अन्य विभागांतही बोंबच आहे. वृक्ष संगोपनासाठी आवाहनमागील वर्षी जिल्हा प्रशासनाकडून ७.६४ लाख रोपांची लागवड करण्यात आली. सर्वेक्षणात ९६ टक्के रोपे जगल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा अत्यल्प आहे. यामुळेच यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांना संगोपनासाठी आवाहन करावे लागत आहे. कमी वृक्षांची लागवड करा; पण त्यांचे संगोपन करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी बैठकीत केले आहे. मागील वर्षीच्या वृक्षारोपणाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ९६ टक्के रोपे जगली ती वन व सामाजिक वनिकरणची आहे. फॉरेस्ट, नॉनफॉरेस्ट व लोकसहभाग या प्रकारांत वृक्ष लागवड झाली होती. यामुळे झाडे जगल्याचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.
वृक्ष संगोपनाचे केले ‘फेक’ सर्वेक्षण
By admin | Updated: June 23, 2017 01:29 IST