ंवर्धा : कायमस्वरुपी गुडघा निकामी झाल्यानंतर रुग्णास अपंगत्व येते. अशा रुग्णांवर शस्त्रक्रियेद्वारे सांधारोपण करणे हाच एक पर्याय आहे. सांधारोपणाची शस्त्रक्रिया मुंबई नागपूरसह केवळ मोठ्या शहरातच उपलब्ध आहे. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिल्यांदाच टोटल हिप रिप्लेसमेंट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया ही अत्यंत महागडी असल्यामुळे सामान्य रुग्णांना मोठ्या शहरात जावून करणे शक्य होत नाही. सामान्य रुग्णालयातील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अनुपम हिवलेकर आणि डॉ. श्रीकांत इंदूरकर यांनी बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. स्रेहल सोनटक्के, डॉ. आदिती शथलवर व डॉ. कुबनाने यांनी ५५ वर्ष वयाच्या दूूर्गा रामदास साहू यांच्यावर ही अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली असून रुग्ण आता सामान्यपणे चालू शकतो. कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रीयेकरिता साधारणत: एक ते दीड लक्ष रुपयांचा खर्च येतो; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साहित्य वगळता संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. वर्ध्याच्या स्टेशन फैल भागात राहणार्या दूर्गा साहू यांना गुडघे दु:खीचा त्रास होत असल्यामुळे अपंगत्व आले होते. या अवघड शस्त्रक्रियेसाठी त्यांना २८ एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर ८ मे रोजी शस्त्रक्रिया करून १९ मे रोजी सामान्य रुग्णालयात अल्प दरात यशस्वीपणे पूर्ण करून सुटी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच कृत्रिम सांधारोपन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मिलींद सोनोने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी अस्थिरोग तज्ज्ञ चमूला मार्गदर्शन केल्याचे कळविले आहे. (प्रतिनिधी) संधीवातामुळे व सांध्याच्या हाडांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे गुडघ्याचा अथवा हिप जॉइंटचा सांधा कायमस्वरुपी निकामी होतो व रुग्णांस अपंगत्व येते. अशा रुग्णांना औषधोपचाराचा फायदा होत नाही. यावर सांधारोपन करणे हा एकमेव परिणामकारक उपाय आहे. जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्यामुळे सांधादु:खीचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आहेत. गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्यामुळे कायम अपंग राहतात.
सामान्य रुग्णालयात प्रथमच कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया
By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST